हिंगोली : जैन परिवार जपत आहे वारकऱ्यांच्या सेवेची परंपरा | पुढारी

हिंगोली : जैन परिवार जपत आहे वारकऱ्यांच्या सेवेची परंपरा

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : जैन परिवाराकडून वारकऱ्यांना चहापाणी देण्याची परंपरा २० वर्षापासून  सुरू आहे. कोरोना महामारीनंतर जवळपास दोन वर्षांनी पंढरपूर येथील आषाढी एकादशीला यात्रेला यावर्षी जवळपास १३ ते १४ हजार भाविकांनी चहा पाण्याचा आस्वाद घेऊन क्षणभर विश्रांतीचा लाभ घेतला आहे.

आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी हिंगोलीहून परभणी मार्गे जाणाऱ्या वारकऱ्यांना क्षणभर विश्रांतीसाठी मागील वीस वर्षापासून बस स्थानक परिसरात चहा पाण्याचे नियोजन जैन परिवाराकडून आज सुद्धा कायम सुरू आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त विदर्भातील विविध ठिकाणाहून हिंगोली मार्गे परभणीला जाणाऱ्या विविध छोट्या-मोठ्या पालखीतील वारकरी मंडळींना या क्षणभर विश्रांतीसाठी येथील मुरलीधर सावजी जैन व अशोक सावजी जैन यांनी २००२ पासून पालखीतील वारकऱ्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था सुरू केली होती.

मागील वीस वर्षापासून या उपक्रमामुळे वारकऱ्यांची सेवा जैन परिवार करत आहे. येथील बसस्थानक परिसरात जाधव यांच्या जागेत हिंगोली परभणी मार्गावर सलग दहा ते बारा दिवस या मार्गावरून जाणाऱ्या दिवसभरच्या पालख्यांना चहा पाण्याची सुविधा मोफत देण्याची परंपरा आज देखील सुरू आहे. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत ही सुविधा आहे. या उपक्रमामध्ये सचिन जैन, सुरेश जाधव ,साईनाथ हरणे, संदीप जैन, अजय मेळे, कृष्णा तेरसे, गणेश अग्रवाल, बबन चिंचोलीकर, अतुल राखुंडे, नागनाथ राखे आदी तरूण मंडळी मोठ्या उत्साहात पंरपरा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून हा उपक्रम राबवित आहे. यावर्षी या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जवळपास १३ ते १४ हजार वारकरी मंडळींनी या ठिकाणी चहा पाण्याची लाभ घेतला आहे. दररोज ६०० ते १००० वारकरी या मार्गावरून जात असताना या ठिकाणी चहा पाण्याची लाभ घेत आहे ही परंपरा भविष्यात सुद्धा अखंडित ठेवण्याचा मनोदय मुरलीधर सावजी जैन परिवाराने दैनिक ‘पुढारी’ शी बोलताना दिला आहे.

हेही वाचा

Back to top button