नांदेड: राजकीय उलथापालथीतही प्रशासकीय यंत्रणा सुरळीत | पुढारी

नांदेड: राजकीय उलथापालथीतही प्रशासकीय यंत्रणा सुरळीत

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शिवेसनेतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असून, राजकीय उलथापालथीमुळे पुढे काय होणार ? याबाबतची उत्सुकता सर्वांना लागली आहे, या राजकीय उलथापालथीचा प्रशासकीय यंत्रणाराजकीय उलथापालथीवर परिणाम झाला काय? याचा कानोसा घेतला असता, बहुतांश शासकीय कार्यालयात दैनंदिनकामकाज सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून आले. सरकारबाबत काय निर्णय होतो, याकडे प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष लागले आहे.

राज्यातील राजकीय पेचप्रसंगामुळे सरकारी कामांना ब्रेक लागल्याचे चित्र दिसून येत असले तरी, बहुतांश शासकीय कार्यालयात दैनंदिन कामकाज पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगर पालिका, पोलिस अधीक्षक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग , कृषी कार्यालय यासह विविध शासकीय कार्यालयाच्या कामकाजावर राज्यातील राजकीय उलथापालथीचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले.

प्रशासकीय यंत्रणेच्या कारभारावर राज्य शासनाचे लक्ष असते, विविध विभागांच्या मंत्र्यांच्या तसेच प्रधान सचिव व अन्य अधिकार्‍यांच्या बैठकांचे नियमित नियोजन केले जाते, मागील आठवडाभरापासून राज्यात राजकीय उलथापालथ सुरू असल्यामुळे महाविकास आघाडीतील मंत्री, आमदार घडामोडीत व्यस्त आहेत.

राज्यातील राजकीय घडामोडी सुरूच राहतील, प्रशासकीय यंत्रणांनी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा आप आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त आहे. या राजकीय उलथापालथीचा प्रशासकीय यंत्रणेवर परिणाम झाला नसला तरी, पुढे काय होईल ? याची उत्सुकता सर्वसामान्यांप्रमाणे प्रशासकीय यंत्रणेलाही लागली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दैनंदिन कामकाज सुरुळीतपणे सुरू असून, जिल्हाधिकार्‍यांकडून विविध बैठका घेऊन कामकाजाचा आढावा घेतला गेला आहे.सध्या पेरणीचे दिवस असून, कृषी विभागाच्या कारभाराकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष्य केंद्रीत
केले आहे.

राज्यातील राजकीय उलथापालथीमुळे प्रशासकीय यंत्रणेवर काही परिणाम झाला आहे, का? असे विचारले असता, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांनी आमचे दैनंदिन कामकाज व्यवस्थितपणे सुरू आहे, असे सांगितले. पोलिस अधीक्षक कार्यालयातील दैनंदिन कामकाज सुरळीतपणे सुरू असले तरी, पोलिस यंत्रणेवर राजकीय उलथापालथीमुळे बंदोबस्ताचा ताण मात्र वाढला आहे.आ. बालाजी कल्याणकर हे गुवाहाटीमध्ये असल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आ. कल्याणकर यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून, नुकतेच आंदोलन करण्यात आले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क आहे.

जिल्हा परिषदेमध्येही दैनंदिन कामकाज व्यवस्थितपणे सुरू असून, नियमितपणे बैठका सुरू असून आढावा घेतला जात आहे.विविध
विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून घेतल्या जाणार्‍या बैठकाही सुरू आहेत, असे सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या कामकाजावर राजकीय उलथापालथीचा कोणताही परिणाम झाला नसल्याचेही जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत असल्यामुळे सरकारचे काय होईल? असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध बैठका पार पडतात, मागील आठवडाभरापासून पालकमंत्री अशोक चव्हाण हे मुंबईत व्यस्त आहेत. येत्या 29 जून रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले असून ही बैठक होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Back to top button