लातूर: दगड फोडत फोडत शिल्पाने मिळविले 90 टक्के गुणसतीश बिरादार | पुढारी

लातूर: दगड फोडत फोडत शिल्पाने मिळविले 90 टक्के गुणसतीश बिरादार

देवणी(लातूर) : दगडाला घाव देता देता आयुष्यही पत्थर दिल झाले. पण या पत्थर दिलातून यशस्वीतेचा मार्ग दाखवणार्‍या शिल्पाची यशोगाथा इतरांसमोर प्रेरणादायी ठरली. तिने दहावी परीक्षेत 90 टक्के गुण मिळवले. देवणी तालुक्यातील धनेगाव येथील दगड फोडणार्‍या वडार समाजातील कामगाराची कन्या महादेव विद्यालयात धडे गिरवत होती. शिल्पा गुरुनाथ दंडवते असे यशस्वी मुलीचे नाव आहे. तिचे आई वडील दगड फोडण्याच्या कामासाठी सांगली जिल्ह्यातील विटा येथे राहतात. लहानपणापासूनच शिल्पाचा सांभाळ आजी-आजोबा केला.

श्री महादेव विद्यालयात दहावीची परीक्षा दिलेली शिल्पा गुरुनाथ दंडवते हिने घरची परिस्थिती हलाखीची असतानादेखील त्याची जाणीव ठेवून व वेळप्रसंगी घरच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आजी आजोबासोबत दगड फोडणीचे काम करत अभ्यासाचे धडे गिरवले. आपण शिकले पाहिजे ही खूणगाठ बांधत अभ्यास केला आणि दहावीला तिला 90 टक्के गुण मिळविले. तिला पुढील शिक्षण घ्यायचे आहे, तिच्या आजी-आजोबा आई-वडिलांची देखील हीच इच्छा आहे.

परंतु पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचणी येत असल्याने विद्यालयाचे प्राचार्य रामलिंग मुळे यांना समजले व त्यांनी ताबडतोब दत्तक घेण्याचे ठरवले आणि तिचे दोन वर्षांचा शिक्षणाचा जे काही खर्च असेल ते स्टॉफतर्फे देण्याचे ठरविले आहे. यामुळे शिल्पाचा शिक्षणाचा पुढील मार्गही मोकळा झाला आहे. हल्ली शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला आहे. चांगल्या शाळेत प्रवेश, गणवेश, आकर्षक शैक्षणिक साहित्य, ट्यूशन, राहण्यासाठी वसतिगृह अशा सुविधेतून अनेकजण शिक्षण घेतात.पण आजही ग्रामीण भागातील विद्यार्थी उपलब्ध साधनसामग्रीतून ज्ञानार्जन करतात. अन् यशाची शिखरे पार करतात हेच वास्तव शिल्पा जाधव हिच्या यशातून ठळकपणे दिसते. तिचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

Back to top button