बीड: बंडखोरांविरोधात शिवसेना आक्रमक | पुढारी

बीड: बंडखोरांविरोधात शिवसेना आक्रमक

बीड, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळे सरकार आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पदही धोक्यात आले आहे. मागील आठ दिवसांपासून या सार्‍या घडामोडी घरत असताना स्थानिक शिवसैनिक कमालीचे अस्वस्थ होते. अखेर त्यांनी सोमवारी (दि.27) जिल्हाभरात निदर्शने करत शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला.

यावेळी एकनाथ शिंदे व इतर बंडखोर मंत्री आणि आमदारांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्याच्या राजकाणात प्रचंड वेगाने घडामोडी घडत होत्या. शिंदे यांच्यासोबत शिष्टाई करण्यासाठी गेलेले आमदारही परत न येता बंडखोरांच्या गटात सामिल होत होते. या सार्‍या वेगाने घडत असलेल्या घडामोडींमुळे स्थानिक शिवसैनिकही बुचकाळ्यात पडले होते. पुढे काय होणार? उद्धव ठाकरे, आपल्या भूमिकेवर ठाम राहणार की, बंडखोरांची मागणी मान्य करणार?

याबाबत शिवसैनिकांमध्ये संभ्रम होता. यामुळे काय भूमिका घ्यावी? हे त्यांना कळत नव्हते. बंडखोरांबाबत प्रचंड रोष असूनही जिल्हाभरातील शिवसैनिक व पदाधिकार्‍यांमधून कसल्याही प्रतिक्रिया उमटत नव्हत्या. दरम्यान, मागील दोन दिवसांत आदित्य ठाकरे रस्त्यावर उतरलेले दिसले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी बैठका- सभा घेऊन बंडखोरांवर जहरी टीका केली. यानंतर बीड जिल्ह्यातील शिवसैनिक व स्थानिक पदाधिकार्‍यांनी सोमवारी (दि.27) रस्त्यावर उतरून निदर्शने केली. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर नेत्यांच्या विरोधात यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. बीड येथे शहरप्रमुख सुनील सुरवसे,किशोर जगताप, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, नितीन धांडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

यावेळी शेवटच्या श्‍वासापर्यंत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे शहरप्रमुख सुनील सुरवसे म्हणाले. दरम्यान वडवणी, परळी, केज, माजलगाव, धारूर, अंबाजोगाई येथे स्थानिक शिवसैनिकांनी निदर्शने करत बंडखोरांचा निषेध व्यक्त केला. स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो झळकावत बंडखोरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

गेवराई येथे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शिवसेना जिल्हा समन्वयक युधाजित पंडित यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर बंडखोर आमदारांचा निषेध व्यक्‍त करत निदर्शने करण्यात आली. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे प्रा. नवले मित्रमंडळाकडून समर्थन

बीड : शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथराव शिंदे यांनी व त्यांच्या समर्थक शिवसेना आमदारांनी जी भूमिका आज घेतली आहे, ती योग्य आहे. महाराष्ट्रामध्ये तळागाळातील सामान्य शिवसैनिक हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेवर प्रेम करीत होता, पण अलीकडे त्याचा हळूहळू भ्रमनिरास होऊ लागला, शिवसेना आपल्या ध्येय धोरणापासून लांब चाललेली त्याला खटकत होते.

पूर्वी शिवसेना सत्तेत नसताना तिचा एक धाक होता, शिवसैनिक म्हणाले तरी त्याचे काम होत होते. त्याउलट आज शिवसेना सत्तेत असताना सामान्य शिवसैनिक हतबल वाटत आहे. याउलट महाराष्ट्रामधून मुबंईला गेलेला शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याकडे आशेने आपले काम घेऊन गेला, तर शिंदे हे त्यांना त्याला वेळ देत असत त्याचे काम मार्गी लावत. त्यामुळे आमदार व शिवसैनिकांना एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक आशेचा किरण दिसत आहे.

त्यांनी जी आज भूमिका घेतली आहे, ती उद्याच्या महाराष्ट्र व शिवसैनिकांच्या हिताची आहे, म्हणून प्रा.सुरेश नवले मित्रमंडळाचे सदस्य शिवलाल मुळूक, सुधीर सुपेकर, बिभीषण चव्हाण, बाळासाहेब काळे, कृष्णा वांगीकर, शहादेव घोडके, पांडुरंग भोसले आदी माजी मंत्री प्रा. सुरेश नवले मित्रमंडळ पदाधिकारी यांनी शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

Back to top button