जेईई परीक्षेमध्ये प्रश्‍न संगणकावरून गायब झाल्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान | पुढारी

जेईई परीक्षेमध्ये प्रश्‍न संगणकावरून गायब झाल्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान

नांदेड,पुढारी वृत्तसेवा : नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा घेण्यात येत असलेल्या जेईई (मेन्स) परीक्षेमध्ये परीक्षार्थींना पुरविण्यात आलेल्या संगणकावरील अनेक प्रश्न सातत्याने गायब होत असल्यामुळे परीक्षार्थींना ते व्यवस्थित दिसू शकले नाहीत. दहा ते पंधरा प्रश्‍न परीक्षार्थीना न दिसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा प्रकार नांदेड शहराबाहेर खुपसरवाडी येथे असणार्‍या मातोश्री प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर घडल्याची तक्रार अनेक परीक्षार्थींनी केली आहे.

याबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा हे प्रकार थांबत नसल्यामुळे प्रत्येक बॅचमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही परीक्षा 29 जून पर्यंत चालणार असल्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशी ही मागणी पालकांनी केली आहे. नांदेड शहरांमध्ये जेईई मेन्स परीक्षेसाठी तीन वेगवेगळे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. परंतु केवळ मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर संगणकातील दोषामुळे असे प्रकार घडत आहेत.25 जून रोजीच्या नऊ ते बारा या वेळेमधील परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना सरासरी दहा ते पंधरा प्रश्न व्यवस्थित संगणकावर न दिसल्यामुळे ते प्रश्न सोडविण्यापासून वंचित राहावे लागले.

यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा चालू असताना मनस्तापही झाला. याचा परिणाम उर्वरित प्रश्न सोडविण्यावरही झाला असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परीक्षा केंद्रावरील वीज खंडित झाल्यामुळे प्रश्न संगणकावरून गायब झाले होते. वीज खंडित झाल्यावर कराव्या लागणार्‍या उपाय योजनाही या परीक्षा केंद्रावरील संगणक कक्षांमध्ये करण्यात आलेल्या नव्हत्या. दिनांक 24 जून च्या परीक्षेच्या वेळी सुद्धा अनेक बॅचेस मध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीत हाच प्रकार घडल्याचे अनेक पालकांनी सांगितले आहे.

वारंवार विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात येऊन सुद्धा महाविद्यालयाच्या प्रशासनाने संगणकीय प्रणाली दुरुस्त करण्याबाबत कोणतीच काळजी घेतलेली दिसत नाही. अनेक परीक्षार्थीं विद्यार्थ्यांनी संगणकाची स्क्रीन व्यवस्थित दिसत नसल्यामुळे व प्रश्न सातत्याने गायब होत असल्याच्या तक्रारी पर्यवेक्षकांना करून सुद्धा त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही असा आरोप केला आहे.

ही स्पर्धात्मक परीक्षा तीनशे गुणांची असून या परीक्षेची काठिण्यपातळी सुद्धा तुलनात्मक दृष्टीने बोर्डाच्या परीक्षेपेक्षा निश्चीतच उच्च दर्जाची असते. या परीक्षेमध्ये फिजिक्स विषयाचे 25, केमिस्ट्री विषयाचे 25 व मॅथेमॅटिक्स विषयाचे 25 प्रश्न असे एकूण 75 प्रश्न तीन तासांमध्ये विद्यार्थ्यांना कमी वेळांमध्ये अचूक पद्धतीने सोडवायचे असतात. यासाठी निर्धारित केलेला वेळ सुद्धा मर्यादित असतो. परीक्षा केंद्रातील गलथान व एनटीएच्या ढिसाळ कारभारामुळे नांदेड शहरातील अनेक विद्यार्थ्यांचे आयआयटीसाठी निवड होण्याचे स्वप्न भंगते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button