औरंगाबाद : जिवापेक्षा युनिफॉर्म जड, पहिलीपासूनच टाय, ब्लेझर | पुढारी

औरंगाबाद : जिवापेक्षा युनिफॉर्म जड, पहिलीपासूनच टाय, ब्लेझर

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जून महिन्यात शहरातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा गणवेश आणि इतर साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याचा आग्रह पालकांना करत आहेत. त्यातच पहिलीच्या विद्यार्थ्यांपासूनच टाय, ब्लेझरची सक्ती केली जात आहे. ब्लेझरच्या किमती पाहता त्या सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या आहेत. शिवाय शहरातील अनेक शाळांना विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत, मात्र आठवड्यातून दोन दिवस ट्रॅकसुटची सक्ती केली जाते. त्यामुळे पालकांना अधिकचा आर्थिक भुर्दंड बसत आहे.

विक्रेते आणि शाळा यांच्यात साटेलोटे असल्याने दुकानदारांकडून युनिफॉर्मच्या किमतीही अव्वाच्या सवा आकारल्या जात आहे. खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच केंद्रीय अभ्यासक्रम शिकवणार्‍या शाळांमध्ये प्रामुख्याने हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. नवे शैक्षणिक सत्र सुरू होताच पालकांना त्यांच्या पाल्यासांठी ठरावीक दुकानातूनच युनिफार्म खरेदीची सक्ती केली जाते. पालकही कोणतीही ओरड न करता निमूटपणे त्या दुकानातून युनिफार्म खरेदी करत आहेत. बाजारभावापेक्षा जास्त दराने ही विक्री केली जाते. याशिवाय त्याचा दर्जाही सामान्य असतो.

प्रत्येक शाळेचा युनिफार्म वेगळा असतो. शाळा संचालक आपल्या सोयीनुसार युनिफार्मचा रंग ठरवितात. प्रत्येक शाळेचे दोन वेगवेगळे युनिफार्म असतात. बुधवार व शनिवारसाठी वेगळा आणि इतर दिवसांसाठी वेगळा, हिवाळ्यासाठी स्वेटरही ते म्हणतील त्याच दुकानातून खरेदी करावे लागते. एवढेच नव्हे तर टाय, बूट, मोजे आणि इतर साहित्याबाबतही हीच अट असते. त्याचा पुरवठा करणारी दुकानेही ठराविक आहेत. स्वेटरदेखील शाळेचेच हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी लागणारे स्वेटरही शाळेने त्यांच्या सोयीनुसार ठरवलेले आहे. तेच स्वेटर विद्यार्थ्यांना घालण्याची सक्ती शाळांमध्ये करण्यात येते. त्यावर शाळेचे नाव असल्याने त्याची किंमत सर्वसाधारण स्वेटरपेक्षा जास्त असते.

दोन हजारांपर्यंतचा गणवेश

प्रत्येक शाळेनुसार दर ठरविलेले आहेत. काही शाळांचा एक गणवेश पंधराशे रुपयांच्या घरात आहे, तर काहींचा दोन हजार रुपयांना मिळतो. बूटदेखील 350 रुपयांपासून मिळतात. मात्र, त्यांचाही दर्जा सामान्य असतो. दोन बूट, दोन गणवेश, शनिवारचा वेगळा गणवेश, मोजे व टाय यांसाठी जवळपास 5 हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांमागे खर्च असतो. एकाच दुकानात हे साहित्य उपलब्ध असल्याने पालकांनाही किमतीबाबत बोलता येत नाही.

Back to top button