औरंगाबाद : नशेखोरांचा राडा, वाद होताच रोखले रिव्हॉल्व्हर | पुढारी

औरंगाबाद : नशेखोरांचा राडा, वाद होताच रोखले रिव्हॉल्व्हर

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : दारूच्या नशेत टोळक्यामध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत होताच तुफान राडा झाला. यात एकाने रिव्हॉल्व्हर काढून समोरच्या तरुणावर रोखली. त्यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाला. दरम्यान, माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन एका अल्पवयीन मुलासह पाचजणांना पकडले. शनिवारी मध्यरात्री हॉटेल रामगिरीसमोर जालना रोडवर हा प्रकार घडला.

या प्रकरणी उपनिरीक्षक बुधा शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये नीलेश सुदाम देहाडे (32), निखिल विजयानंद आगलावे (19, रा. ठाकरे नगर, विजय कॉलनी, एन-2, सिडको), शिवराज दत्तात्रय संबळे (28, रा. आंबिकानगर, मुकुंदवाडी), योगेश नागोराव हेकाडे (32, रा. गल्ली क्र. 3, आंबिका नगर, मुकुंदवाडी) यांच्यासह एका 16 वर्षीय मुलाचा समावेश आहे. नीलेश देहाडेकडे रिव्हॉल्व्हर आढळून आली. अधिक माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री 11.50 वाजता पोलिस नियंत्रण कक्षातून सिडको पोलिसांना माहिती मिळाली की, काही लोक रामगिरी हॉटेलसमोर रिव्हॉल्व्हर हातात घेऊन भांडण करीत आहेत. त्यानंतर सिडको ठाण्यातील उपनिरीक्षक बुधा शिंदे यांच्यासह सिडको व मुकुंदवाडी ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाच जणांना पकडले. त्यातील नीलेश देहाडे यांच्याकडे रिव्हॉल्व्हर मिळून आली. हे रिव्हॉल्व्हर वापरण्याचा देहाडेकडे कुठलाही परवाना नाही. या सर्वांविरुद्ध सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शिवराज संबळे याच्यावर रिव्हॉल्व्हर रोखण्यात आले होते. त्याची न्यायालयाने जामीनावर सुटका केली.

गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा

रामगिरी हॉटेलसमोर गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा झाली होती. पोलिसांनाही तशाच माहितीचा कॉल करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात तसा कुठलाही प्रकार घडलेला नाही. तरुणाला मारहाण करण्यात आली. सर्वजण नशेत होते, हे खरे आहे. पण, गोळीबार झाला नाही. केवळ रिव्हॉल्व्हर रोखून दहशत निर्माण केल्याचा प्रकार असल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.

15 दिवसांचे प्रशिक्षण घेतले

नीलेश देहाडे याच्याकडे रिव्हॉल्व्हर आढळली आहे. त्याने ही रिव्हॉल्व्हार शहरातूनच खरेदी केल्याचे बोलले जाते. तसेच, त्याने शहरातच
एअरगन चालविण्याचे 15 दिवसांचे प्रशिक्षण घेतल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान, देहाडेने मोंढा नाका (जिन्सी ठाणे हद्द) येथून हे रिव्हॉल्व्हर खरेदी केल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी उपायुक्त उज्ज्वला वनकर यांच्यासह पोलिस निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अशोक अवचार यांनी भेट दिली. उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत आहेत.

चिकलठाण्यातही गोळीबार?

रामगिरी हॉटेलसमोरील घटना ताजी असतानाच दुचाकीने चार युवक काळे शर्ट घालून चिकलठाण्यातील द्वारकेश मार्केटसमोरील एका टपरीवर आले. त्यातील एकाच्या हातात रिव्हॉल्व्हर होते. त्याने ते रिव्हॉल्व्हर तरुणावर रोखल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एकच दहशत पसरली. त्यावेळी बंदूकधारी युवकाने राऊंड फायर केल्याचा दावा उपस्थितांनी केला आहे. त्याठिकाणी दहशत निर्माण केल्यानंतर ते युवक मिनी घाटीजवळ थांबले. त्यांचा पाठलाग करीत टपरीवरील युवक मिनीघाटीजवळ येताच तेथून त्यांनी सिडकोच्या दिशेने धूम ठोकल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे चिकलठाण्यातही गोळीबार झाला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Back to top button