औरंगाबाद : शिवसेनेतील बंडाळीचे जिल्हाभरात पडसाद | पुढारी

औरंगाबाद : शिवसेनेतील बंडाळीचे जिल्हाभरात पडसाद

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचे पडसाद रविवारी (दि.26) जिल्हाभरात उमटले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेतून बंडखोरांवर निशाणा साधला. जिल्ह्यातील बंडखोर आमदारांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून पालकमंत्री आणि जिल्हाप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

शिंदेगटात जाण्यासाठी आपणांस 50 कोटी रुपयांची ऑफर होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट कन्नडचे आ. उदयसिंह राजपूत यांनी केला. युवा सेनेच्या वतीने बडखोरांच्या निषेधार्थ क्रांती चौकात मुंडण आंदोलन करण्यात आले, तर रोहयोमंत्री संदीपान भुमरे आणि
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनासाठी पैठण आणि सिल्लोडमध्ये रॅली काढण्यात आली.

नेत्यांच्या मुलांनी पहिला दगड हातात घ्यावा

बंडखोर आमदारांविरोधात जिल्ह्यात फारसे पडसाद उमटलेले नाहीत. रविवारी शिवसेनेच्या पत्रकार परिषदेतही हाच मुद्दा कळीचा ठरला. पत्रकार परिषदेस हजर असलेल्या एका शिवसेना कार्यकर्त्याने नंतर पत्रकारांजवळ आपली भावना व्यक्त केली. शहरातील बहुतांश शिवसेना पदाधिकार्‍यांची मुले राजकारणात आहेत. अनेकांना युवा सेनेत पद देण्यात आले आहे. त्यांनी पहिला दगड उचलावा. मग आम्ही कार्यकर्ते चार दगड उचलू. फक्त आम्हीच कुठवर गुन्हे अंगावर घ्यायचे, असे सवालही या कार्यकर्त्याने केला.

संजय शिरसाट यांनी मोट बांधली

शिवसेनेने ज्यांना मोठे केले, तेच शिवसेनेला विसरले. जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदारांनी गद्दारी केली आहे. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी या बंडखोरांची मोट बांधली. त्यांनी याआधी 1991 मध्ये बंड केले होते. प्रदीप जैस्वाल यांनीही एकदा शिवसेना सोडली होती. जैस्वाल यांना महापौरपद, खासदारकी दिली. त्यांच्या लोकसभा निवडणुकीवेळी मी पालकमंत्री होतो, त्यांच्या निवडणुकीचा सर्व खर्च मीच केला होता. भुमरे यांना उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपद दिले, पण तेही शिंदे गटात सहभागी झाले. हे दु:खदायक आहे.

काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी : पवार

राजकीय भूकंपाचा काँग्रेसवर परिणाम नाही. या परिस्थितीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहे, असे आमच्या नेत्यांनी त्यांना सांगितले आहे. पक्षाच्या नेत्यांच्या सूचनेवरून महाराष्ट्रात आलेले कमलनाथ यांनीही मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार नामदेव पवार यांनी दिली आहे. तर माजी आमदार सुभाष झांबड म्हणाले, राजकीय भूकंपाचा काँग्रेसवर काहीही परिणाम नाही.

Back to top button