औरंगाबाद : मोसंबी लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला | पुढारी

औरंगाबाद : मोसंबी लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला

पाचोड, पुढारी वृत्तसेवा : मोसंबी लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल पुन्हा वाढल्याने पाचोड (ता. पैठण) बाजारात मोसंबीची रोपे (पन्हरी) खरेदीसाठी गर्दी होत आहे. रोपांच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

तालुक्यातील पाचोड, लिंबगाव, थेरगाव, मुरमा, कोळी, बोडखा, वडजी, सानपवाडी, हर्षी, दावरवाडी, आडूळ, नांदर, खातगाव, बालानगर, रजापूर, आंतरवाली, एकतुनी ही गावे मोसंबीचे पीक घेणारा भाग म्हणून सर्वदूर परिचित आहे, परंतु दिवसेंदिवस पावसाचे कमी होणारे प्रमाण आणि मोसंबीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी त्रस्त होऊन मोसंबीच्या बागांवर कुर्‍हाड चालवून मोसंबीच्या जागेवर डाळिंबाची लागवड केली. अल्पवधीतच हा परिसर डाळिंब ग्राम म्हणून ओळखला जात आहे. शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात डाळिंब लावले खरे; परंतु डाळिंबाचे पीक जोपासण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. सतत वातावरण बदलानुसार डाळिंबावर रोगराई पडू नये म्हणून महागड्या औषधांची फवारणी करावी लागते. हा सर्व खर्च शेतकर्‍यांना परवडत नसला, तरी दोन पैसे पदरात पडतील या आशेने शेतकरी मेहनत घेत आहेत; परंतु यंदा डाळिंबाचे उत्पादन भरमसाट झाल्याने दर घसरले.

डाळिंबांची देखभाल व उत्पादन काढण्याची प्रक्रिया किचकट ठरत असल्याने शेतकर्‍यांचा कल मोसंबी लागवाडीकडे वाढला असल्याचे दिसून येते. आठवडे बाजारात मोसंबीची रोपे (पन्हेरी) मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहेत. अडीच हजार ते साडेतीन हजारापर्यंत शेकडा या दराने शेतकर्‍यांनी पन्हेरी खरेदी केल्याचे दिसून आले. पन्हेरी खरेदी व्यवहारातून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे पाहावयास मिळाले. पावसाने दडी मारल्याने मोसंबी रोपांची विक्री ठप्प झाली होती, परंतु पावसाने उशिरा का होईना दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून, लागवडीची कामे जोमात सुरू आहेत.

Back to top button