नांदेड : आ. बालाजी कल्याणकर यांच्या आमदारकीवर गंडांतर? | पुढारी

नांदेड : आ. बालाजी कल्याणकर यांच्या आमदारकीवर गंडांतर?

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शिंदेनिष्ठ असणारे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या आमदारकीवर गंडांतर आले असून शिवसेनेने त्यांची आमदारकी रद्द करण्याचा प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्षांकडे पाठविला आहे, या राजकीय घडामोडीमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असून मुंबई ते सुरतमार्गे गुवाहाटी असा प्रवास आ. कल्याणकर यांनी
केला आहे. पहिल्या दिवशी शिंदे यांच्यासमवेत असणार्‍या आमदारांचे छायाचित्र विविध वृत्त वाहिन्यांसह सोशल मीडियामध्ये झळकले होते. यामध्ये आ. कल्याणकर यांच्या लपवालपवीयुक्त हालचालीचे सर्वांना दर्शन झाले होते.

आ. कल्याणकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याचा गौप्यस्फोट कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार
परिषदेत केला होता, त्यामुळे आ. कल्याणकर यांची निष्ठा नेमकी कोणाशी? असा प्रश्नही उपस्थित केला गेला होता. शिवसेनेने बंडखोर
आमदारांवर कारवाईचे अस्त्र उगारले असून 17 आमदारांची आमदारकी रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सादर केला आहे. यामध्ये आ. कल्याणकर यांचा समावेश आहे. आ. कल्याणकर यांची आमदारकी रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव दाखल झाल्याचे वृत्त नांदेडमध्ये धडकताच त्यांच्या समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आ. कल्याणकर
यांची आमदारकी रद्द होते की नाही, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Back to top button