सेवासदन बघून मकंरद अनासपुरे भारावून गेले | पुढारी

सेवासदन बघून मकंरद अनासपुरे भारावून गेले

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : मीरा कदम आणि धनराज कदम हे सेवासदनच्या माध्यमातून निराधार लेकरांसाठी अतिशय मोलाचे कार्य करीत आहेत. त्यासाठी सेवासदनच्या मुलांसाठी भविष्यात एखादी इमारत असणे गरजेचे आहे. यामकामी पुढाकार घेऊन हिंगोलीकरांनी लोकवर्गणीतून एखादा भूखंड सेवासदनासाठी उपलब्ध करून  द्यावा, अशी मागणी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केली. हे सेवासदन बघून अनासपुरे भारावून गेले होते.

येथील मुलांचे वसतिगृह असलेल्या सेवा सदनाच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून समाजासाठी अनमोल योगदान देणारे मकरंद अनासपुरे  हे सेवा सदन बघून अक्षरशः भारावून गेले होते. त्यांनी येथील मुलांशी संवाद साधला. सेवासदनची मुले विविध क्षेत्रांत उंच भरारी घेत आहेत. त्यासाठी मुलांचे अभिनंदनही त्यांनी केले. सेवासदनमध्ये सध्या 52 मुले आहेत. अजून प्रवेशासाठी काही मुलांचे अर्ज सेवासदनकडे आले आहेत.

परंतु इमारत भाड्याची  असल्यामुळे जबाबदारी पेलणे कठीण जात आहे. सेवासदनचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. देशाच्या सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांच्या माता-पित्यांचा सत्कार यावेळी सेवासदन परिवारातर्फे करण्यात आला. अशाच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार यावेळीकरण्यात आला. निराधार लेकरांना आपणा सर्वांच्या सहकार्याने आम्ही नक्कीच सांभाळू ,अशी प्रतिक्रिया मीरा कदम यांनी व्यक्त केली.

धनराज कदम यांनी हिंगोलीकरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल मुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध क्षेत्रातील व्यक्तीने सहकार्य केले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, राजाभाऊ शेळके, योगिता बडवे, किरण सोनटक्के, शीतल सोनटक्के, डॉ जयदीप देशमुख, भूषण देशमुख, माधुरी देशमुख, योगेश शिंपी, रोहित कंजे, डॉ. दीपक मोरे, डॉ.विठ्ठल रोडगे, डॉ. नामदेव कोरडे, डॉ.संजय नाकाडे, डॉ. श्याम जाधव, डॉ. यशवंत पवार, ज्ञानोबा मुसळे, अमोल भिसे, समीर भिसे, कवी शिवाजी कर्‍हाळे, महेश सराफ, किशोर तळेकर, जयेश खर्जुले, जगन टेकाळे, रविराज मुदीराज आदींची उपस्थिती होती.

Back to top button