बीड : अवैध गर्भपात प्रकरणात डॉ.गवारेला ताब्यात घेणार | पुढारी

बीड : अवैध गर्भपात प्रकरणात डॉ.गवारेला ताब्यात घेणार

बीड, पुढारी वृत्तसेवा : अवैध गर्भपातादरम्यान शीतल गाडे या महिलेचा 5 जून रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणातील सहाजण न्यायालयीन कोठडीत असून आता या प्रकरणातील सहआरोपी डॉ.गवारे याला ताब्यात घेण्यासाठी पिंपळनेर पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील आणखी माहिती समोर येऊ शकणार आहे. जिल्ह्यात गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्येच्या घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. त्यामुळे या सर्व घटनांवर अंकुश निर्माण झाल्याचे वरवर दिसत असले तरी गर्भलिंगनिदान व गर्भपाताचा प्रकार सुरुच असल्याचे शीतल गाडे प्रकरणानंतर समोर आले होते.

शीतल गाडे या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात अधिक तपास करत पोलिसांनी अंगणवाडी सेविका मनिषा सानप, सतीश सोनवणे, गायके, निंबाळकर यांच्यासह महिलेचा पती आणि सासर्‍यास अटक केली होती. हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपासादरम्यान जालना येथील डॉ.गवारे याचे नाव समोर आल्याने त्याला सहआरोपी करण्यात आले होते. तोच या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे आता निष्पन्न होत असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पिंपळनेर पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे.
डॉ.गवारे हा सध्या जालना येथील कारागृहात असून त्याला लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे. त्याच्याकडून या प्रकरणातील अधिक माहिती समोर येऊ शकणार आहे.

अवैध गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीही न्यायालयीन कोठडीत आहेत. आता या प्रकरणात पीसीपीएनडीटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी दिली.
पीसपीएनडीटी अ‍ॅक्टनुसार होणार्‍या या कार्यवाहीसाठी डॉ.महादेव चिंचोले यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.सतीश सोनवणे हा ज्या सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून अवैधपणे गर्भलिंगनिदान करत होता त्या मशीनबाबतची माहिती घेतली जात आहे. ही मशीन कोणाच्या नावावर नोंदणी केलेली आहे, याबाबत औरंगाबाद व जालना येथे माहिती मागवण्यात आली आहे. ती माहिती मिळाल्यानंतर सर्व पुरावे एकत्रित करुन पीसीपीएनडीटी अ‍ॅक्टनुसार न्यायालयात सादर केली जातील अशी माहिती प्राधिकृत अधिकारी डॉ.महादेव चिंचोले यांनी दिली.अवैध गर्भपात प्रकरणातडॉ.

गवारेला ताब्यात घेणारयापक मोहीम राबवणे आवश्यक ;  मनीषा तोकले

अवैध गर्भपात प्रकरणात महिलेचा मृत्यू आणि त्यानंतर प्रशासनाने केलेल्या कारवाईसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी प्रशासनाच्या कार्यवाहीवर असमाधान व्यक्त केले. एका महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. किमान त्यानंतर तरी गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी काय उपाययोजना झाल्या, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

जिल्ह्यात किती पोर्टेबल सोनाग्राफी मशीन जिल्ह्यात आहेत, त्यावर काही कारवाई करण्यात आली का, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्याकडे गर्भधारणा, गर्भपात, बालमृत्यू याची माहिती अद्ययावत आहे का? अवैध गर्भपात प्रकरणानंतर ती माहिती घेण्यात आली का? गर्भवती महिलांना ट्रॅकींग कोड कितव्या महिन्यात दिला जातो, या सर्व बाबींवर जिल्हाशल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने काम करुन कार्यवाही करणे अपेक्षित आहे. परंतु तसे होतांना दिसत नाही, ही बाब गंभीर असल्याचे मत मनिषा तोकले यांनी व्यक्त केले.

Back to top button