हिंगोली : शालेय साहित्य 20 टक्क्यांनी महागल | पुढारी

हिंगोली : शालेय साहित्य 20 टक्क्यांनी महागल

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा ःकोरोनामुळे गत दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. यावर्षी कोरोनानियंत्रणात असल्याने शैक्षणिक वर्षाला दणक्यात सुरुवात झाली,परंतु शालेय साहित्यात पंधरा ते वीस टक्के वाढ झाल्याने पालकांच्या खिशाला कात्री लागली असून, महागाईचा शिक्षणाला फटका बसला आहे.

यंदा वह्यांसह अन्य साहित्याचे भाव वाढल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. महागाईचा फटका शिक्षण क्षेत्राला बसला असून, सध्या बाजारपेठेमध्ये नवनवीन प्रकारच्या वह्यांसह विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. कार्टून, सुपर हिरो, खेळाडू, निसर्गरम्य चित्र, फुले, पक्षी, प्राणी या छायाचित्रांसह बहुरंगी वह्यांना मुलांची पसंती दिसून येत आहे. बालकांच्या पसंतीस उतरेल असे शैक्षणिक साहित्य बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे.

गत दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे आर्थिक नुकसानीत असलेले व्यावसायिक नव्या शैक्षणिक सत्राच्या प्रारंभामुळे उत्साहित आहेत. सध्या दुकानांवर बालकांची गर्दी असून नोटबुक, कंपॉस पेटी, नोटपॅड, पाटी, पेन, पेन्सिल, दप्‍तर, टिफीन, वॉटरबॅग, अंकलिपी या वस्तू खरेदी करण्याकडे पालकांचा कल आहे, परंतु वस्तू महागल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतो आहे. सर्वच साहित्याच्या पंधरा ते वीस टक्क्यांनी किमती वाढल्या आहेत. नाइलाजाने पालकांना त्या विकत घ्याव्या लागत आहेत.

शैक्षणिक साहित्याचे दर वाढल्याने पालकांचा हिरमोड होत असला, तरी आम्हा व्यावसायिकांचा नाइलाज होत असल्याचे शालेय साहित्य व्यावसायिक नैनवाणी यांनी सांगितले. वह्यांसह इतर सर्वच साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही शाळांकडून तर ठराविक दुकानातूनच साहित्य घेण्याचे सांगितले जात आहे. वाढलेल्या किमतीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, परंतु याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

Back to top button