बीड : विठ्ठल दर्शनासाठी 180 बसेस | पुढारी

बीड : विठ्ठल दर्शनासाठी 180 बसेस

बीड : पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनाला जाणार्‍या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागातून 180 बसेस सोडण्यात येणार आहेत. भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक
अजयकुमार मोरे यांनी केले आहे.

बीड विभागातून पंढरपूर यात्रेसाठी 5 ते 14 जुलै 2022 या कालावधीत 180 बसेस सोडण्यात येणार आहेत. मुख्य दिवस एकादशी दि.10 जुलै, तर पौर्णिमा दि.13 जुलै या प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. बीड आगारातून 30, परळी 25, धारूर 20, माजलगाव 20, गेवराई 20, पाटोदा 20, आष्टी 20 तर अंबाजोगाई आगारातून 25 अशा एकूण 8 आगारांतून 180 बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांसाठी पंढरपूर जाण्याकरिता आगाऊ आरक्षण बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

भाविकांच्या मागणीनुसार व आवश्यकतेप्रमाणे बसेस उपलब्ध करण्यासाठी प्रवाशांनी संबंधित आगार प्रमुखाशी संपर्क करावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी केले आहे. दरम्यान, दोन वर्षानंतर प्रथमच आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये यात्रा भरणार आहे. सन 2019 मध्ये 130 बसेसचे नियोजन करण्यात आले होते.

दोन वर्षांपूर्वी 61 हजार वारकर्‍यांचा प्रवास दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये बीड विभागातील बसेसच्या माध्यमातून 61 हजार 776 प्रवाशांची वाहतूक करण्यात आलेली होती. आषाढी वारीला जाण्याकरिता आता दोन वर्षांनंतर वारकर्‍यांना संधी मिळणार असल्याने मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन 180 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button