हिंगोली: जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या दोघा बाेगस डाॅक्‍टरांवर गुन्‍हा दाखल | पुढारी

हिंगोली: जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या दोघा बाेगस डाॅक्‍टरांवर गुन्‍हा दाखल

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून वैद्यकीय व्यवसाय करून जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या दोघा बाेगस डाॅक्‍टरांवर सेनगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणातील दोघा आरोपींविरूद्ध भादवि कलमानुसार तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायिक अधिनियम 1961 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेनगाव येथील आरोपी ज्ञानबा केशवराव काळे (रा. केसापूर ता. जि. हिंगोली) व माधव बि. रसाळ (रा. हाताळा ता. सेनगाव जि. हिंगोली) यांनी हृदय अशोक हॉस्पिटल या नावाने खाजगी हॉस्पिटल थाटले. हे दोघे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना, संगणमत करून बोगस वैद्यकीय व्यवसाय करत होते. ही गोष्ट जिल्हा प्रशासनाच्या चौकशी दरम्यान निष्पन्न झाली. त्यामुळे या दोन्ही आरोपींवर सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सेनगाव डॉ. सचिन राठोड यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या घटनेतील आरोपींवर भादवि कलम व महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायिक अधिनियम 1961 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींना अद्याप अटक झालेले नाही. तपास सेनगाव पोलिस करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button