परभणी: भोगाव (देवी)च्या शेतशिवारात आढळला विवाहितेचा मृतदेह | पुढारी

परभणी: भोगाव (देवी)च्या शेतशिवारात आढळला विवाहितेचा मृतदेह

परभणी; पुढारी वृत्तसेवा: जिंतूर तालुक्यातील भोगाव (देवी) येथे एका वीस वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह शेतशिवारातील तलावातील पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आला. ही घटना आज मंगळवारी (दि. १७) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेत मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे.

भोगाव देवी येथील ग्रामस्थ सदाशिव गोरे यांची मुलगी अंजना योगेश मखमले (वय २०) हिचे लग्न जालना जिल्ह्यातील सातोना येथे ६ महिन्यांपूर्वी झाले होते. गुरूवारी नागपंचमी सणासाठी विवाहित अंजना हिला तिचे वडील सातोना येथून आपल्या घरी भोगाव देवी येथे घेऊन आले होते.

या दरम्यान दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी ११. ३० वाजण्याच्या सुमारास शौचालयाला जाते म्हणून ती घरातून गेली होती. रात्री उशिरापर्यंत अंजना घरी परतली नसल्याने गावात व आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला आसता ती सापडली नाही.

डॉ. रमेश जाधव यांच्या शेतातील तळ्यात सापडला मृतदेह 

दुसर्‍या दिवशी दि.१६ ऑगस्ट सोमवारी सकाळी ७. ३० वाजण्याच्या सुमारास भोगाव देवी परिसरातील डॉ. रमेश जाधव यांच्या शेतातील तळ्यात मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यावर नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली.

सदर माहिती सरपंच कृष्णकांत देशमुख यांनी पोलिसांना सांगितली. यानंतर घटनास्थळी पो. नि. दीपक शिंदे, पो. उप. निरीक्षक एस. पी. चौरे, टोपाजी कोरके, बीट जमादार श्रीमती संगीता वाघमारे, अर्जुन कायंदे, सदाशिव काळे, अरविंद धबडे आदी पोलीस व सरपंच कृष्णराव देशमुख हे उपस्थित होते.

यानंतर अंजनाचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत जिंतूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले.

सदर घटनेत अंजनाचे मामा गिताराम बिलवलकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास स्थानिक पोलिस करत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button