परभणी: हद्दपार माजी नगरसेवक पोलिसांच्या जाळ्यात | पुढारी

परभणी: हद्दपार माजी नगरसेवक पोलिसांच्या जाळ्यात

जिंतूर (परभणी); पुढारी वृत्तसेवा : जिंतूर पोलीस स्टेशन हद्दीतून काही महिन्यांपासून हद्दपार असलेले माजी नगरसेवक शेख इस्माईल हा हद्दपारीचा कालावधी सुरू असताना बेकायदेशीर जिंतूरात वास्तव्य करीत होता. जिंतूर पोलिसांनी शनिवारी (दि. ४ जून) रोजी रात्री ११ वाजता कोम्बिंग ऑपरेशन करून त्यास राहत्या घरातून ताब्यात घेतले . याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरातील माजी नगरसेवक शेख इस्माईल शेख सलीम व इतर तीन आरोपींना जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अनेक गुन्हेगारी घटनेमुळे ९ महिन्याकरिता हद्दपारीचे आदेश पारित केले होते. मात्र, हद्दपारीचे कालावधी सुरू असतानाच शेख इस्माईल हा जिंतूरात बेकायदेशीर रित्या वास्तव्य करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शनिवारी रात्री ११ च्या सुमारास पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत धडक कारवाई केली.

हद्दपार असलेला आरोपी शेख इस्माईल यांना ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शेख इस्माईलला पोलिसांमार्फत पुन्हा परभणी जिल्ह्याबाहेर औरंगाबाद एमआयडीसी पोलीस हद्दीत सोडण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफणे, पो.नि. दीपक दंतुलवाड, सपोनि विलास कोकाटे, पीएसआय कोरके, पो कॉ. वाघमारे, महिला पो. कॉ. लीला जोगदंड आदींच्या पथकाने केली.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button