नांदेड : ट्रक-कारची समोरासमोर धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू | पुढारी

नांदेड : ट्रक-कारची समोरासमोर धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

नरसीफटा ; पुढारी वृत्तसेवा : नांदेड – देगलूर महामार्गावरील कुंचेली फाट्याजवळ ट्रक आणि कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले. तर गरोदर असलेली महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी (दि.३) सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा चुराडा झाला.

या भीषण अपघातात कारमधील शंकरराव गंगाराम जाधव (वय ५५) महानंदा शंकरराव जाधव (वय ५२, रा. टाकळी, ता. नायगाव, जि. नांदेड) आणि मुलगी कल्पना शिंदे (रा. केरूर ता. बिलोली) यांचा जागीच मृत्यू झाला. तर धनंजय जाधव यांना अपघातस्थळावरून नांदेडच्या शासकीय दवाखान्यात घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली. आणि गर्भवती असलेली स्वाती शिंदे (रा. केरुर) यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नरसीकडून शंकरनगरकडे जाणाऱ्या कारला शंकरनगर पासून जवळच असलेल्या कुंचेली फाट्याजवळ शंकरनगरकडून नरसीकडे भरधाव येणाऱ्या (एपी ०३ टी. ए. ३१८६) या ट्रकने (एमएच २५ टी १०७५) कारला समोरासमोर जोराची धडक दिली.

रामतीर्थ पोलीस स्टेशनचे विजय जाधव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना बाहेर काढून नायगाव येथील रुग्णालयात दाखल केले. वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षर:शा चुराडा झाला.

हेही वाचा

Back to top button