हिंगोली : भरधाव ऑटो रिक्षाची कारला धडक; दोघेजण जागीच ठार | पुढारी

हिंगोली : भरधाव ऑटो रिक्षाची कारला धडक; दोघेजण जागीच ठार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली ते सेनगाव मार्गावर ब्रह्मपुरी पाटीजवळ नियंत्रण सुटलेल्या भरधाव ऑटोने कारला जोराची धडक दिली. या अपघातात ऑटोमधील दोघे जण जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी (दि.२१) रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अंकुश साहेबराव साबळे व अनुराधा अंकुश साबळे ( रा. लिंबाळा हुडी) अशी अपघातात ठार झालेल्‍यांची नावे आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील लिंबाळा हुडी येथील अंकुश साबळे व त्यांची पत्नी अनुराधा साबळे ऑटो रिक्षाने शनिवारी सकाळी हिंगोलीकडे जात होते. त्यांची ऑटो हिंगोली ते सेनगाव मार्गावर ब्रह्मपुरी पाटीजवळ आला असताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ऑटो समोरून येणाऱ्या कारवर जावून आदळली. त्यानंतर ऑटो रस्त्यावर उलटला. या अपघातामध्ये अंकुश व अनुराधा हे जागीच ठार झाले. हिंगोलीहून सेनगांवकडे जाणाऱ्या कारमधील सेनगांव पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुभाष चव्हाण हे जखमी झाले आहेत.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच नरसी नामदेव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. पोटे, जमादार पी. जी. डवले, महाजन यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. दोघांना उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

अपघाताचे सत्र वाढले

दरम्यान या मार्गावर मागील काही दिवसांपासून अपघात सत्र वाढले आहेत. या मार्गावर शुक्रवारी टेम्पो कारच्या भीषण अपघातात एक जण ठार झाला होता. त्यानंतर पुन्हा आज कार व ऑटो अपघातात दोघे जण ठार झाले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button