केज; पुढारी वृत्तसेवा : मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असलेले केज तालुक्यातील होळ येथीळ न्या. संभाजीराव शिंदे यांची राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अकिल कुरेशी यांच्या निवृत्तीनंतर न्या. संभाजी शिंदे यांची या पदावर नियुक्ती झाली आहे.
न्या. संभाजीराव शिंदे यांनी औरंगाबाद येथील तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून (सध्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) एल.एल.बी.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर एल.एल.एम.चे शिक्षण त्यांनी पुणे विद्यापीठ आणि इंग्लंडच्या विद्यापीठातून पूर्ण केले. १९८९ साली त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिलीस सुरुवात केली. १९९५ साली त्यांची औरंगाबाद खंडपीठात सहा. सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती झाली. १९९७ साली त्यांची सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. २००२ पासून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिवाणी तसेच फौजदारी प्रकरणांमध्ये सरकारच्या वतीने काम पहिले. १७ मार्च २००८ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि काही कालावधीनंतर स्थायी नियुक्ती देण्यात आली होती.
नुकतेच राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अकिल कुरेशी हे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर न्यायमूर्ती मनिंद्र मोहन श्रीवास्तव यांनी राजस्थान उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर आता न्या. संभाजीराव शिंदे यांची राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्या. शिंदे यांची मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याने होळ ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.
हेही वाचलंत का ?