Dilip Walse-Patil : नांदेडसाठी लवकरच स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय | पुढारी

Dilip Walse-Patil : नांदेडसाठी लवकरच स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय

नांदेड ; पुढारी वृत्तसेवा : नांदेड महानगर आणि जिल्ह्यातील एकंदर परिस्थितीचा विचार करून नांदेड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय स्थापण्याचा विषय लवकरच मार्गी लागेल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील  (Dilip Walse-Patil) यांनी शनिवारी (दि.१४) येथे जाहीर केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संयुक्‍त पत्रकार परिषदेत वार्ताहरांनी नांदेड जिल्ह्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, स्थानिक खासदार तसेच विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांना खंडणीसाठी येणार्‍या धमक्या याकडे लक्ष वेधले असता, पवारांनी हातातील ध्वनीक्षेपक वळसे-पाटील  (Dilip Walse-Patil) यांच्याकडे देताच त्यांनी नांदेड महानगरसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय निर्माण करण्याची घोषणाच केली. तत्पूर्वी नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात भाजप खासदार प्रताप पाटील -चिखलीकर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले होते.

वळसे- पाटील यांनी येथे आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसमवेत प्रदीर्घ चर्चा केली. नांदेड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांची संख्या ३६ असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनावर मोठा ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी पोलीस अधीक्षक आणि नांदेड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्‍त असे विभाजन केले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होईल, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

नांदेड शहराच्या वाढत चाललेला विस्तार विचारात घेऊन दहा वर्षांपूर्वीच नांदेड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय स्थापन करण्यात यावे, असा प्रस्ताव पाठविण्यात आला होता; पण तत्कालीन आघाडी तसेच नंतरच्या भाजप सरकारच्या काळात हा प्रस्ताव प्रलंबित होता. अलीकडच्या काळात काँग्रेस नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड शहराच्या पोलीस आयुक्‍तालयाचा प्रलंबित विषय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

अशोक चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात नांदेड येथे महसूल आयुक्‍तालय स्थापण्याचा निर्णय घेतला होता; पण नंतर तो कायदेशीर व राजकीय वादात अडकला. तो अजूनही लटकलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी या खात्याचे मंत्री या नात्याने आपल्या पहिल्याच नांदेड दौर्‍यात पोलीस आयुक्‍तालयाची घोषणा करून टाकली. मंत्री अशोक चव्हाण सध्या काँग्रेसच्या शिबिरासाठी उदयपूरमध्ये आहेत. पोलीस आयुक्‍तालयाच्या घोषणेसंदर्भात त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आमचे पोलीस दल सक्षम आहे. हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे देण्याची गरज नाही, असे वळसे पाटील यांनी नमूद केले. अभिनेत्री केतकी चितळेच्या वादग्रस्त, आक्षेपार्ह पोस्टवर स्वतः शरद पवार यांनी येथे कोणतेही भाष्य केले नाही; पण या प्रकरणी आवश्यक ती कारवाई होईल, असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button