नांदेड : सतिगुडा येथील भीषण आगीत गुरांचे ६ गोठे जळून खाक | पुढारी

नांदेड : सतिगुडा येथील भीषण आगीत गुरांचे ६ गोठे जळून खाक

वाईबाजार, पुढारी वृत्तसेवा : माहूर तालुक्यातील सतिगुडा येथे आज (दि.१०) सकाळी लागलेल्या भीषण आगीत गुरांचे ६ गोठे जळून खाक झाले. दोन गोठ्यांत दोन कुटुंब राहत असल्याने प्रसंगावधान राखून कुटुंबाना बाहेर काढल्याने मोठी जीवित हानी टळली. या दुर्घटनेत शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सकाळी नऊच्या सुमारास अचानक गुरांच्या गोठ्यांना आग लागली. पाहतापाहता आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे आसपास असलेल्या दुसऱ्या गोठ्यांनाही आग लागली. विशेष म्हणजे यापैकी दोन गोठ्यांत दोन कुटुंब वास्तव्यास होती. त्यांना गावातील नागरिकांनी कसेबसे बाहेर काढून त्यांचे जीव वाचवले. गावकऱ्यांनी आग विझवण्याचे कसोशीने प्रयत्न केले; परंतु आग आटोक्यात आली नाही.

परिणामी गावकऱ्यांकडून ही बातमी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या माध्यमातून माहूर प्रशासनाला कळविण्यात आली. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्परता दाखवत माहूर व किनवट येथील अग्निशामक दलाला दूरध्वनीवरून कळवले. दरम्यान, माहूर येथील अग्निशमक दलासोबत त्यांनी घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर पोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले. या आगीत गुरांचे चार गोठे तसेच दोन गोठ्यातील दोन कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य अक्षरश: जळून खाक झाले.आगीचे कारण अजून समजले नाही.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button