परभणी : औरंगाबाद-नांदेड महामार्गावर पोलिसांकडून वाहनधारकांची लूट; स्थानिक युवकांना हाताशी धरुन वसुली | पुढारी

परभणी : औरंगाबाद-नांदेड महामार्गावर पोलिसांकडून वाहनधारकांची लूट; स्थानिक युवकांना हाताशी धरुन वसुली

चारठाणा, जिंतूर पुढारी प्रतिनिधी : औरंगाबाद-नांदेड महामार्गावरील देवगाव फाटा (जि.परभणी) येथील पोलीस चौकीवर चेकिंगच्या नावाखाली महामार्ग पोलिसांकडून वाहनधारकांची लुट केली जात आहे. या महामार्गावर बाहेरील राज्यातील वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते तेव्हा स्थानिक युवकांना हाताशी धरुन, खुलेआम ही वसुली केली जात आहे. सदर चौकीवर एक दोन पोलीस कर्मचारी खुर्चीवर बसुन, तर दोन तीन स्थानिक युवक हातात शिट्टी, काठ्या घेउन, वाहने बाजुला लाऊन वसुल्या करताना दिसून येतात.

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद-नांदेड महामार्गावर देवगाव फाटा येथे महामार्ग पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. सदर महामार्गावर राज्यांसह आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेशसह इतर बाहेर राज्यातील वाहनांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते. सदर चौकीवर तपासणीच्या नावाखाली वाहने रोखुन कोणतीही तपासणी न करता सरळ सरळ युवकांच्या साह्याने वसुली सुरू असल्याचे चित्र पहायला मिळते.

विषेश म्हणजे सदर चौकीवर एक ते दोन कर्मचारी असतात, तेही खुर्चीवर बसुन असतात आणि दोन तीन स्थानिक युवक शिट्ट्या, काठ्या हातात घेऊन जणू काही आपण पोलिस आहोत असं समजुन वसूली करत असतात. खरंतर या चौकीबाबत अनेकदा प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

महामार्ग पोलिस निरीक्षक, वरिष्ठ अधिकारी किंवा संबधित खात्याचे मंत्री येणार असल्याची कुनकुन लागताच चौकी बंद केली जाते. त्यामुळे देवगाव फाटा येथील ही पोलीस चौकीच नियमबाह्य आहे की, काय असा प्रश्न पडतो. याबाबत येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता उत्तर देण्यास टाळाटाळ केली जाते. तरी वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालून वाहधारकांची होणारी लुट थांबवावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button