हिंगोली : भाटेगाव शिवारात कालव्यामध्ये पडून नागपूरच्या दोघांचा मृत्यू | पुढारी

हिंगोली : भाटेगाव शिवारात कालव्यामध्ये पडून नागपूरच्या दोघांचा मृत्यू

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथून वारंगा मार्गे देवदर्शनासाठी निघालेल्या दोघांचा भाटेगाव शिवारात कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार दुपारी घडली आहे. निलेश महिंद्रदास देवमुराद (रा.दिघोरी नागपूर) असे मयताचे नाव असून एकाचा शोध सुरू आहे. नागपूर येथून निलेश देवमुराद, सौरभ तुळशीराम दुसे, नयन गजानन चोथे, अंकीत दामोदर टाले व अन्य एक जण ( रा. दिघोरी, नागपूर ) कारने (क्र. एमएच -20 – एफपी 2788 ) आज सकाळी साडेसहा वाजता नागपूर येथून वारंगा फाटा मार्गे तुळजापूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते.

बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते वारंगा नजीक भाटेगाव शिवारातील कालव्याजवळ थांबले. याठिकाणी त्यांनी स्वयंपाक करून भोजन देखील केले. त्यानंतर चालक प्रशांत हात धुण्यासाठी कालव्यात गेला. यावेळी हात धूत असताना तो कालव्याच्या पाण्यात पडला यावेळी त्याने मदतीसाठी आरडाओरड केली. त्याला वाचवण्यासाठी निलेश मध्ये पडला मात्र तो देखील पाण्यासोबत वाहून जाऊ लागला हा प्रकार त्यांच्या मित्राच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली.

तर सौरभ याने त्यांना काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो देखील वाहून जाऊ लागला होता. हा प्रकार त्याच परिसरात काम करत असलेल्या काही लोकांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने सौरभ यास बाहेर काढले मात्र निलेश व प्रशांत वाहून गेले. या प्रकाराची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान वडकिले, जमादार प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने निलेश व प्रशांत यांचा कालव्याच्या पाण्यात शोध सुरू केला. काही वेळातच निलेश याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र प्रशांतचा अद्यापही शोध सुरूच आहे. पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर सहाय्यक पोलीस अधीक्षक यातिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button