बीड : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसने सहभागी होऊ नये, अशी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची इच्छा होती. मात्र, केवळ भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आणि शेतकर्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी त्यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविली, असे धक्कादायक वक्तव्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी केली.
सोनिया गांधी यांनी आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपद नको; पण पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, अशी अट घातली होती, असे पटोले म्हणाले.
भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. याशिवाय शेतकर्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, हा विषय आमच्याद़ृष्टीने प्राधान्याचा होता, असे पटोले यांनी गेवराई येथे बोलताना सांगितले.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकदा मंत्र्यांमध्ये मतभेद आणि नाराजी समोर आली आहे. त्यातच पटोले यांनीही उघडपणे विधान करून आपली नाराजी नोंदविल्याचे म्हटले जाते. दरम्यान, 2024 च्या निवडणुकीत मोदी सरकार पायउतार होईल आणि काँग्रेसची सत्ता येईल. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे भाकित नाना पटोले यांनी रविवारी सोलापुरात केले. काँग्रेसतर्फे आयोजित संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.