हिंगोली जि.प.तील वरिष्ठ सहाय्यकासह कार्यालयीन अधीक्षकाला २३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले - पुढारी

हिंगोली जि.प.तील वरिष्ठ सहाय्यकासह कार्यालयीन अधीक्षकाला २३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील शिक्षकाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या वेतनवाढीचे आदेश काढण्यासाठी २३ हजारांची लाच घेणार्‍या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यकासह कार्यालयीन अधिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहाथ पकडले.  सचिन अडबलवार (वरिष्ठ सहाय्यक), संतोष मिसलवार (कार्यालयीन अधिक्षक) अशी त्यांची नावे आहेत.

जिल्हयात आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना जादा वेतनवाढ देण्याचे आदेश काढण्यासाठी तक्रारदार शिक्षकाने मागील काही दिवसांपासून शिक्षण विभागाकडे पाठपुरावा सुरु केला होता. मात्र, त्यांना शिक्षण विभागाकडून दाद दिली मिळत नव्हती. याच दरम्यान सन २०१९ पासून पाठपुरावा केल्यानंतर दि. ३ जानेवारी रोजी जादा वेतनवाढ देण्याचे आदेश काढले गेले. त्यासाठी संबंधितांनी शिक्षकाकडे २३ हजार रुपयांच्‍या लाचेची मागणी केली.

यानंतर तक्रारदार शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी (दि.१३) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक निलेश सुरडकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख युनुस उर्फ शेख शकील, जमादार विजय उपरे, तान्हाजी मुंडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, सुजित देशमुख, राजाराम फुफाटे, रुद्रा कबाडे यांच्या पथकाने जिल्हा परिषदेत सापळा रचला. या दरम्यान, जिल्हा परिषदेच्या कॅन्टींनमध्ये सचिन अडबलवार यास २० हजाराची आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागात संतोष मिसलवार यास ३ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत विभागाने दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याप्रकरणी शिक्षण विभागाचा एक अधिकारही पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचलं का?

Back to top button