

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीसाठी मतदारसंघांचे आरक्षण निश्चित झाल्यामुळे आता ग्रामीण भागात दिवाळीत राजकीय फटाके जोरात फुटणार आहेत. विविध पक्षांच्या तालुका व गावपातळीवरील नेत्यांनी गाठीभेटी सुरू केल्या असून, राजकीय समीकरणे नव्याने मांडली जाऊ लागली आहेत. यानिमित्ताने राजकीय नेत्यांच्या मुलांचे लाँचिंग करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू असून, हक्काचा मतदारसंघ आरक्षित झाल्याने पर्यायाचा शोध सुरू आहे. यावेळी जि.प. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलासाठी राखीव असल्याने या गटातील लढती रंगणार आहेत.
पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे झाल्यास इच्छुक पाच वर्षे तयारी करत असत. परंतु, मतदारसंघावरील बदलत्या आरक्षणामुळे इच्छुकदेखील आता सावध पावले टाकत असतात. मतदारसंघाच्या पुनर्रचनेची फारशी त्यांना भीती नसते; परंतु आरक्षण कधी जाहीर होईल, याकडे मात्र त्यांचे सतत लक्ष असते. कारण, मतदारसंघाच्या आरक्षणावरच त्यांचे राजकारण अवलंबून असते. त्यामुळे आरक्षण प्रक्रिया उमेदवारांसाठी सेमीफायनल मानली जाते. आरक्षण कोणत्या वर्गासाठी निश्चित होते, यावरच पुढील लढतीचे भविष्य अवलंबून असते. अनेक उमेदवारांची राजकीय स्वप्ने आरक्षणावरच थांबतात, तर काहींसाठी हेच यशाकडे वाटचाल सुरू होण्याचे पाऊल ठरते. यंदाही काही दिग्गज नेत्यांचे गणित बिघडले असून, काही नव्या चेहर्यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात होणार आहेत. ज्या ठिकाणी काटाजोड लढती आहेत, तेथे मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता असून, त्याला नेत्यांचीही मान्यता असणार आहे.
जिल्हा परिषदेची 2017 मध्ये निवडणूक झाली होती. मावळत्या सभागृहात 67 सदस्य होते. आता त्यामध्ये एकने वाढ होऊन 68 सदस्य संख्या झाली आहे. काही मतदारसंघांची नावे बदलली आहेत, तर काही मतदारसंघ पूर्णपणे नव्याने निर्माण झाले आहेत. आरक्षण निश्चित झाल्यामुळे आता अनेक तालुक्यांमध्ये नव्याने रंग चढला आहे. सध्या गावागावांत यंदा कोण उतरणार मैदानात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता उमेदवारीसाठी चुरस
मिनी विधानसभा म्हणून ओळखणार्या जिल्हा परिषदेतून राज्याचे अनेक नेतृत्व तयार झाले आहे. त्यामुळे आता खरी चुरस उमेदवारीसाठी लागणार आहे. इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. पक्षांच्या उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला आहे.