

जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने आज शनिवारपासून सुरू होणार आहेत. असे असतानाही ऊस दराबाबत अद्यापही तोडगा निघाला नसल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच काही भागांत आंदोलनाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. गेल्या 8 दिवसांपासून उसाचे आंदोलन पेटले आहे. प्रशासनाने साखर कारखानदार आणि आंदोलकांमध्ये समन्वयाची भूमिका घेत दराचा सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी बैठक घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आंदोलन तीव— होण्याअगोदर बैठक घेऊन हंगाम सुरू करण्याची शेतकर्यांची अपेक्षा आहे.
हंगाम सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी गतवर्षीचा दुसरा हप्ता आणि या वर्षीची पहिली उचल मागणी केली आहे. जिल्ह्याच्या काही भागांत कारखाने सुरू असताना शेतकरी संघटनांचा प्रभाव असणार्या भागांमध्ये कारखान्यांनी ऊसतोडी दिल्या नाहीत. पूर्व भागातील साखर कारखान्यांनी 1 नोव्हेंबरनंतरच कारखाने सुरू करण्याची तयारी केली आहे. बहुतांश साखर कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली आहे. गतहंगामातील साखर आणि उपपदार्थांच्या दरानुसार शेतकर्यांना जादाचा लाभ मिळावा या मागणीबरोबरच यावर्षीच्या उसाला एफआरपीपेक्षा जादाचा भाव मिळण्याची शेतकरी संघटनांनी मागणी केली आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने 3300 ते 3500 रुपये प्रतिटन पहिली उचल देण्याच्या तयारीत आहेत. अधिकृतपणे हंगाम सुरू होण्यास दोन दिवसांचा कालावधी बाकी असताना प्रशासनाच्या पातळीवर मात्र शांतता आहे.
जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील नेत्यांनी ही बाब थेट प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. ऊस दरावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी लवकरच कारखानदार आणि आंदोलकांची बैठक घेण्याचे स्पष्ट केले आहे. वास्तविक, आठ-दहा दिवसांपूर्वीच प्रशासनाने बैठकीची पावले उचलणे गरजेचे होते. मात्र, आज हंगाम सुरू होत असतानाही अद्याप बैठक झालेली नाही. पहिल्याच बैठकीत ऊस दराचा प्रश्न मार्गी लागला असे एकही उदाहरण आजवरच्या ऊस दराच्या आंदोलनात पाहायला मिळाले नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्यांची पहिली बैठक केवळ शेतकरी संघटना आणि कारखानदारांची मते आजमावण्यासाठी होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी पहिली उचल मागताना वेगवेगळ्या दराची मागणी केली आहे. कारखानदार सध्या तरी एकरकमी विनाकपात पहिली उचल देऊन गाळप सुरू करण्याच्या मनस्थितीत आहेत. दुसरीकडे संघटनांकडून वेगवेगळ्या दराची मागणी केल्याने शेतकर्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.