इचलकरंजीत गुंडांकडून वाहनांची तोडफोड; दहशत

या प्रकारामुळे भोनेमाळ परिसरात तणाव
Vandalism of vehicles by goons in Ichalkaranji
इचलकरंजी : तोडफोड प्रकरणातील संशयितांना न्यायालयासमोर हजर करताना शिवाजीनगर पोलिस.Pudhari File Photo
Published on
Updated on

इचलकरंजी : येथील भोनेमाळ परिसरात टोळक्याने दहशत माजवत पार्किंग केलेल्या तीन वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. यावेळी व्यावसायिकाला रस्त्यात अडवून त्याच्याकडील 2,700 रुपये जबरदस्तीने काढून घेण्यात आले. तसेच एका महिलेसह चौघांना ढकलून दिल्याने तेही जखमी झाले. या प्रकारामुळे भोनेमाळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. तोडफोड करणार्‍यांपैकी दोघांना नागरिकांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

Summary
  • भोनेमाळमधील प्रकार

  • दोघांना नागरिकांचा बेदम चोप

  • पाचजणांना अटक

याप्रकरणी पोलिसांनी आशातुल्ला हारुण जमादार (वय 26), रोहित प्रकाश मांडे (21), अक्षय अशोक घाडगे (22), अक्षय श्रीकांत बेळगावे (26), श्री विश्वास लोखंडे (24, सर्व रा. भोनेमाळ परिसर) या पाच संशयितांना अटक केली आहे. या संशयितांपैकी काहीजण जर्मनी गँगमधील असून, ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

येथील भोनेमाळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. त्यातच पुन्हा बुधवारी रात्री टोळक्याने दहशत माजवल्याने खळबळ उडाली. फिर्यादी महादेव साळी हे बुधवारी स्टेशनरीचे साहित्य पोहोचवण्यासाठी मोटारसायकलवरून निघाले होते. त्यावेळी तिथे असलेल्या टोळक्याने त्यांना अडवले. त्यांच्या खिशातील 2,700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तिथे झालेल्या वादानंतर हातात मागाचा मारा, काठी, दगड आदींनी त्यांनी जिव्हेश्वर मंदिर मार्गावरून पुढे जाताना आमच्या नादाला कोण लागले तर त्यांना जिवंत सोडणार नाही, असे म्हणत आरडाओरडा करीत दहशत माजवत सरस्वती हायस्कूलच्या दिशेने गेले. यावेळी त्यांनी रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या तीन वाहनांच्या काचा फोडल्या व तोडफोड केली. यावेळी रवींद्र भांडे, उत्तम वडेर, युवराज सातपुते यांच्यासह अन्य एका महिलेला ढकलून देऊन जखमी केले. या घटनेने नागरिकांमध्ये घबराट पसरली. काही नागरिकांनी धाडसाने पुढे येत त्यातील दोघांना पकडून बेदम चोप दिला. त्याच दरम्यान शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी पोहोचल्याने अन्य संशयित पळून गेले. नागरिकांनी पकडलेल्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेनंतर परिसरात नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी वारंवार घडणार्‍या अशा घटनांमुळे संताप व्यक्त केला. पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी नागरिक येणार होते. त्याच दरम्यान उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली व कारवाईची ग्वाही दिली. पोलिसांनी याप्रकरणी दरोड्यासह नुकसान केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल केला. तातडीने हालचाल करीत जमादार, मांडे, घाडगे, बेळगावे या चौघांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दुपारच्या सुमारास श्री लोखंडे या अन्य एका संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक शरद वायदंडे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news