कोल्हापूर : महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेसची ताकद एवढी वाढली आहे तर आमदार पाटील यांनी विधानसभेच्या जिल्ह्यातील दहा जागांवर उमेदवार उभे करून निवडून आणावेत, असे आव्हान दिले.
मुंबईत बसून राष्ट्रवादीचे जिल्ह्यात अस्तित्व नाही, असा अपप्रचार ते करत आहेत. राष्ट्रवादीकडे असणार्या मतदारसंघातील उमेदवार ठरविण्याचा अधिकार राष्ट्रवादीचा, तेथील उमेदवार बदला असे सांगणारे हे कोण? असा घणाघाती हल्लाही पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना चढविला. चंदगड विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेला मेळावा रद्द करावा; अन्यथा आम्ही कोल्हापूर दक्षिण, उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात उतरवू, असा इशाराही त्यांनी शनिवारी दिला.
महाविकास आघाडीचे जिल्ह्याचे नेतृत्व आ. सतेज पाटील करतात, हे आम्ही मान्यच करतो. त्यामुळे मुंबईत, दिल्लीत चर्चा करण्यापूर्वी त्यांनी जिल्ह्यातील आघाडीतील स्थानिक नेत्यांशी चर्चा करणे अपेक्षित आहे; परंतु तसे न करता ते मुंबईत बसून जिल्ह्यातील सर्वच जागांवर दावा करू लागले आहेत, असे सांगून पाटील पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असताना आम्ही ती काँग्रेसला सोडली. ही जागा निवडून आणण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. असे असताना शाहू महाराज यांचा विजय केवळ काँग्रेसमुळेच झाला, असे भासविण्याचा प्रयत्न आ. पाटील करत आहेत. मुळात शाहू महाराज निवडणुकीस तयार नव्हते; परंतु आपण व कै. पी. एन. पाटील यांनी त्यांना तयार केले, ही वस्तुस्थिती आहे आणि ती त्यांनादेखील माहीत आहे. असे असताना सर्व काही काँग्रेसने केले, असे त्यांचे म्हणणे असेल तर आम्ही काय करायचे? आम्हालाही अस्तित्वासाठी लढावे लागेल. जिल्ह्यात फक्त काँगे्रसची ताकद असेल, तर त्यांनी जिल्ह्यातील सर्व जागांवर उमेदवार उभा करून निवडून आणून दाखवावेत.
चंदगड, कागल राष्ट्रवादीकडे असल्यामुळे येथील उमेदवार ठरविण्याचे अधिकारदेखील राष्ट्रवादीलाच आहेत. असे असताना चंदगड विधानसभा मतदारसंघात वेगळी आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते प्रथम थांबवावेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाची कोल्हापुरात ताकद नसल्याचे सांगत आहेत, ते चुकीचे आहे. शरद पवार यांना मानणारे लाखो लोक आहेत, हे कोणी विसरू नये. महाविकास आघाडी अभेद्य राहावी यासाठी आम्ही पद-प्रतिष्ठा बाजूला ठेवून काम करत आहोत, याचा कोणी गैरअर्थ काढू नये. आमच्या स्वाभिमानालाच जर डिवचणार असाल, तर आम्हालाही आमचे अस्तित्व दाखवावे लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला. यावेळी शहराध्यक्ष आर. के. पोवार, महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले, युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, अनिल घाटगे, सुनील देसाई, निरंजन कदम, आप्पा हजारे आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा सुरू होती. कोल्हापूरची जागा काँग्रेसला द्यावी, त्याच्या बदली विधानसभेची कोल्हापूर उत्तरची जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा शब्द आ. सतेज पाटील यांनी दिला होता. त्यांनी तो शब्द पाळावा, असेही पाटील म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद नाही, असे म्हणणार्यांना शरद पवार यांची सभेला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गरज कशाला लागते? असा सवालही पाटील यांनी केला.
हसन मुश्रीफ म्हणजे राष्ट्रवादी, असा बर्याच जणांचा गैरसमज आहे. तो प्रथमत: डोक्यातून प्रथम काढून टाकावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व नाही, असे वाटत आहे त्यांनी केवळ कोल्हापूर जिल्ह्यात मैत्रीपूर्ण लढत करण्याची हिंमत दाखवावी म्हणजे कोण किती पाण्यात आहे हे दिसून येईल, असेही पाटील म्हणाले.