नवी दिल्ली : इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) शिष्टमंडळाने केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी वृत्तपत्रांसंबंधीच्या वेगवेगळ्या विषयांवर शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यावर वृत्तपत्रांच्या समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन मंत्री वैष्णव यांनी दिले.
या बैठकीला ‘आयएनएस’चे अध्यक्ष राकेश शर्मा, दै. ‘पुढारी’चे समूह संपादक आणि पुढारी वृत्तसमूहाचे चेअरमन, ‘आयएनएस’ कार्यकारिणी सदस्य डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
नवव्या दर संरचना समितीच्या शिफारशी, न्यूजप्रिंटवरील 5 टक्के सीमा शुल्क मागे घेणे, डिजिटल न्यूज सबस्क्रिप्शनवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मागे घेणे, इंग्रजी वृत्तपत्रांचा सीबीसीसह पॅनेलमेंटमध्ये भेदभाव, भारतीय वृत्तपत्रांचे संयुक्त राष्ट्र (यूएन) भाषांमध्ये भाषांतर, ई-पेपरसाठी स्वतंत्र दरांचा विचार, लेखापरीक्षित परिचलन प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ, प्रिंट मीडियासाठी सीबीसी बजेट पुनरावृत्ती, सीबीसीची थकबाकीसह इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
शिष्टमंडळाने मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर व समस्येवर केंद्रीय मंत्र्यांनी विचार केला आणि योग्यवेळी ते ते मुद्दे हाती घेण्याचे तसेच त्या त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. आयएनएसच्या शिष्टमंडळाने बैठकीत चर्चा केलेल्या मुद्द्यांचे तपशीलवार निवेदनही केंद्रीय मंत्र्यांना सुपूर्द केले.