

पन्हाळा : पन्हाळगडाच्या पायथ्याशी नर बिबट्याच्या हल्ल्यात एका बिबट्याच्या मादी बछड्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच कुटुंबातील दुसरा बछडा बिथरल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारपासून या बछड्याने गावात धुमाकूळ घातला असून पाच ते सहाजणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. यात तिघे गंभीर जखमी झाले असून वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने ड्रोनद्वारे शोध मोहीम सुरू केली आहे.
गुरुवारी सकाळी आपटी पैकी सोमवार पेठेत भरवस्तीत बछड्याचा मृतदेह सापडला होता. प्राथमिक तपासात नर बिबट्याने केलेल्या हल्ल्यादरम्यान हा मादी बछडा बळी पडल्याचे स्पष्ट झाले. या हल्ल्यानंतर बिबट्याचे कुटुंब विखुरले आणि वेगळा झालेला दुसरा बछडा बिथरला. त्यामुळे त्याने गावातील नागरिकांवर हल्ल्याचे प्रयत्न सुरू केले.
गुरुवारी रात्री बादेवाडी येथील अजय आनंदा जाधव (25) आणि जेऊर येथील विकास बाळू डावरे (48) यांच्यावर बछड्याने हल्ला केला. अजय जाधव यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी गणपती मंदिराजवळ राम तानाजी गावडे (30) आणि गीता रामराव गिरीगोसावी (43) यांचा बछड्याने पाठलाग केला. दुपारी जयवंत गोविंद डावरे (60) यांच्यावर हल्ला केला. या सलग घटनांमुळे गावात भीतीचे वातावरण आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने बचाव मोहीम राबवली. परिक्षेत्र वनाधिकारी अजित माळी यांच्या उपस्थितीत वन्यजीव बचाव पथक वनपाल सागर पटकारे, वनरक्षक संदीप पाटील आणि पोलिस पाटील रघुनाथ बुचडे यांच्या मदतीने बिबट्याचा शोध ड्रोनच्या सहाय्याने घेतला जात आहे. परिसरात गस्त वाढवण्यात आली असून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
आक्रमक झालेल्या बछड्यापासून सावध राहण्याची गरज जंगल अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. वन विभागानेही परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे, रात्री एकट्याने बाहेर न पडण्याचे आणि कोणतीही हालचाल दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. बचाव पथक बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.