

रेंदाळ : हुपरी येथे इलेक्ट्रिक मोपेडची डीकी उचकटून त्यातील 1890 ग्रॅम वजनाची 1 लाख 10 हजार 905 रुपये किमतीची चांदी दोघा अज्ञातांनी लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी 10.30 च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद महेश सर्जेराव मोरे (रा. विशालनगर, हुपरी) यांनी हुपरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
मोरे यांच्या मालकीच्या इलेक्ट्रिक मोपेड (एमएच 09 जीएच 3222) चा वापर दुकानातील चांदीचा माल आणण्यासाठी केला जातो. दुकानातील कामगार विजय झाकलेकर याला मोपेड घेऊन हुतात्मा स्मारक जवळील वरद सिल्व्हर या ठिकाणी पाठवले होते. त्या ज्वेलर्समधील 1890 ग्रॅम वजनाची चांदी घेऊन झाकलेकर चांदीनगर येथील आर.बी.ज्वेलर्समध्ये माल घेण्यासाठी आला होता. मोपेड ज्वेलर्सच्या दारात लावून चांदी आणण्यासाठी वरच्या मजल्यावर तो गेला होता. काही वेळानंतर मोपेडची डीकी उघडी असल्याचे व डिकीतील चांदी लंपास झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. याप्रकरणी दोघा अज्ञात इसमांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघा अनोळखी व्यक्तींनी मोटासायकलवरून पाठलाग केल्याचे दिसून येत आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.