

तानाजी खोत
कोल्हापूर : दिवाळीच्या खरेदीची सुरुवात धनत्रयोदशीने होते. सोने, चांदी आणि भांडी खरेदी करण्याची पारंपरिक प्रथा आजही कायम आहे. यावर्षी चांदी 1 लाख 85 हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली असताना बाजारात ‘चांदीची मासोळी’ खरेदी करण्याचा एक नवा ट्रेंड आला आहे.
धनत्रयोदशीला चांदी खरेदी करणे हे पवित्र मानले जाते. चांदीला चंद्र ग्रहाशी जोडले जाते, जी घरात स्थिरता आणि शाश्वत संपत्ती आणते, अशी मान्यता असल्याने चांदीच्या मासोळीला मोठी मागणी आहे. संपूर्ण देशभरातून ही मागणी आहे. मासोळ्यांची मागणी करणारे अनेक कॉल देशभरातून येत आहेत, असे चांदीच्या वस्तूंचे व्यापारी जयेश ओसवाल यांनी सांगितले. पौराणिक कथांमध्ये मासा हा विष्णूंचा पहिला अवतार ‘मत्स्यावतार’ आहे, संकटातून संरक्षण करतो आणि नवीन शुभारंभाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तसेच, मासोळी ‘जल-प्रवाह’ आणि अखंड संपत्तीचा ओघ दर्शवते.
या ट्रेंडमागे आधुनिक मार्केटिंग, वास्तू आणि फेंगशुईचे तसेच सोशल मीडियाचा मोठा प्रभाव आहे. ज्वेलर्स आणि विक्रेते चांदीच्या मासोळीला वास्तू दोष निवारण आणि आर्थिक प्रगतीसाठीचा उपाय म्हणून सादर करत आहेत. चांदीच्या नाण्याऐवजी ही आकर्षक कलाकृती घरात ठेवणे लोकांना अधिक पसंत पडते.
मासोळीचे तीन प्रकार
चांदीची मासोळी प्रामुख्याने 3 ते 20 ग्रॅम वजनात मिळते, ज्याची किंमत साधारणपणे 500 पासून सुरू होते. मासोळीचे तीन प्रकार आहेत : एकल मूर्ती, जी तिजोरीत ठेवण्यासाठी खरेदी केली जाते. मासोळीची जोडी, सुसंवाद व नफ्यात वाढ व्हावी, यासाठी ठेवली जाते. लहान प्रतीकात्मक मूर्ती ही पूजेवेळी वापरली जाते.