Shivaji University | शिवाजी विद्यापीठ 63 वर्षांत प्रथमच कुलगुरूंविना

डॉ. शिर्के पायउतार, तरी नव्या कुलगुरूंची निवड नाही; कुलगुरू, प्र-कुलगुरू, चार विद्या शाखांच्या अधिष्ठातांशिवाय विद्यापीठ पोरके?
Shivaji University
शिवाजी विद्यापीठPudhari File Photo
Published on
Updated on

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र आणि सोलापुरातील बहुजन समाजाच्या उच्च शिक्षणाची दारे उघडावीत, यासाठी राज्याचे तत्कालिन गृह राज्यमंत्री बाळासाहेब देसाई यांनी ताकदीने कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ खेचून आणले. यामुळे कार्यक्षेत्रातील लाखो विद्यार्थ्यांना जगाच्या कानाकोपर्‍यात आपले भवितव्य घडविण्याची संधी मिळाली. तथापि, विद्यापीठाच्या स्थापनेपासून तब्बल 63 वर्षांमध्ये प्रथमच शिवाजी विद्यापीठाची अवस्था ‘कुलगुरूंशिवाय विद्यापीठ’ अशी झाली आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित विद्यापीठाचा कार्यभार हाकायचा कोणी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मावळते कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या कुलगुरूपदाचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर 2025 रोजी संपुष्टात आला. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 च्या कलम 11 अन्वये विद्यापीठाच्या कुलगुरूंचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी नव्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया राबविणे आवश्यक असते. यासाठी कुलपती नव्या कुलगुरूंची निवड करण्यासाठी समिती नियुक्त करतात. या समितीमध्ये विद्यापीठामार्फत एका प्रतिनिधीचे नाव आवश्यक असते. राज्य शासनाचा सचिव दर्जाचा एक अधिकारी, राज्यपालांचा प्रतिनिधी अशी तीन ते पाच सदस्यांची समिती नव्या कुलगुरूंचा शोध घेऊन त्यातील योग्य नावाची शिफारस कुलपतींना करते. या समितीसाठी शिवाजी विद्यापीठाने आवश्यक समिती प्रतिनिधीचे नाव पाठवून आपली जबाबदारी पार पाडली. तथापि, कुलपती म्हणजेच राज्यपाल भवनाकडून याविषयी निवडीचे आवश्यक ते सोपस्कार पूर्ण केले गेले नाहीत. यामुळे डॉ. शिर्के यांना कायद्यानुसार कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर पायउतार व्हावे लागले. ते नव्या वारणा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून विराजमानही झाले.

कुलगुरूंची निवड झाल्यानंतर ते आपल्या कार्यभाराला सहायक ठरण्यासाठी प्र-कुलगुरू तसेच चार विद्या शाखांच्या अधिष्ठातांची निवड करतात. जेव्हा कुलगुरूंचा कार्यकाल संपतो, तेव्हा प्र-कुलगुरू व अधिष्ठातांचा कार्यकालही आपोआप संपुष्टात येतो. या नियमाने सध्या कुलगुरूंसोबत उर्वरित पाच महत्त्वाची पदेही रिक्त झाली आहेत.

शिक्षण क्षेत्रातील तत्परता गेली कोठे?

विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू डॉ. आप्पासाहेब वरूटे यांचे कार्यकालादरम्यान निधन झाले. याची माहिती मिळाल्यानंतर कुलपती भवनाने डॉ. विलासराव घाटे यांची प्रभारी कुलगुरूपदाच्या नियुक्तीचा आदेश तत्काळ पारित केला. मग डॉ. शिर्के निवृत्त होत आहेत, याची कल्पना असताना आणि नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया अपूर्ण आहे, असे माहीत असताना अशी स्थिती निर्माण का झाली?, याचे उत्तरही शोधणे गरजेचे आहे.

राज्यकर्त्यांकडून सतत आखडता हात

संघर्ष हा शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासून पाचवीला पूजला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील तत्कालिन बड्या प्रस्थांनी कोल्हापुरात विद्यापीठ स्थापण्यास विरोध केला होता. हा विरोध मोडून काढून बाळासाहेब देसाई यांनी विद्यापीठ कोल्हापुरात आणले आणि त्याला छत्रपतींचे नाव देऊन त्यावर सोनेरी मुकुट चढविला गेला. परंतु, या विद्यापीठाला अर्थसहाय्य करण्यापासून ते नव्या उपक्रमांच्या पाठीशी राहण्यापर्यंत राज्यकर्त्यांनी सतत आखडता हात घेतल्याचे दक्षिण महाराष्ट्राने पाहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news