

विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील गोळीवणे येथील निनू यशवंत कंक (वय 70) आणि त्यांच्या पत्नी रखुबाई निनू कंक (65) या वृद्ध दाम्पत्याच्या खुनाचे गूढ अखेर उलगडले. सराईत गुन्हेगार विजय मधुकर गुरव (वय 35, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी) यानेच लाकडी दांडक्याने व दगडाने ठेचून ही निर्घृण हत्या केल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या तपासात उघड झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गुरवला अटक केली आहे. शनिवारी त्याला शाहूवाडी येथील न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
19 ऑक्टोबरच्या सकाळी नऊच्या सुमारास कंक दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले होते. त्यांचा मुलगा सुरेश कंक दिवाळीसाठी आई-वडिलांना घरी आणण्यासाठी गेला असता ही घटना समोर आली. रखुबाई यांचा मृतदेह झोपडीपासून 20 मीटर अंतरावर तर निनू कंक यांचा मृतदेह पाण्यामध्ये आढळून आला होता. पहिल्यांदा बिबट्यासारख्या वन्य प्राण्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला; परंतु वन विभागाच्या चौकशीत तो फोल ठरला. यानंतर पोलिसांनी घातपाताच्या दिशेने तपास सुरू केला.
एलसीबीच्या पथकाने मलकापूर, आंबा, निनाई परळे परिसरात तळ ठोकून तपासाची चक्रे गतिमान केली. शवविच्छेदन अहवालानुसार कंक दाम्पत्याचा मृत्यू 16 ऑक्टोबरच्या सायंकाळी झाला होता. पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला. घटनास्थळी झटापट झाल्याचे पुरावे आढळले. या परिसरातील एका फार्महाऊसचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सराईत गुन्हेगार विजय गुरव दोन दिवसांपासून त्या परिसरात फिरत असल्याचे स्पष्टपणे दिसले. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गुरव आणि कंक दाम्पत्यामध्ये वाद झाला. यातूनच गुरवने लाकडी दांडक्याने व दगडाने ठेचून त्यांची क्रूर हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर कंक दाम्पत्याचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्नही गुरवने केला होता; मात्र पोलिसांच्या तपासापुढे त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.
वृद्ध दाम्पत्याचा खून लुटीच्या इराद्याने केला की जेवण न दिल्याच्या रागातून, याचा तपास पोलिस करत आहेत. विजय गुरव हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर 2014 मध्ये सांगली येथे खुनाचा गुन्हा, कोल्हापूर जिल्ह्यात 20 हून अधिक मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच शाहूवाडी पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात गुरव पसार झाला होता.
गुरव हा कंक दाम्पत्याच्या संपर्कात कसा आला? त्यांच्या शेडकडे तो का गेला? वाद होण्यामागील नेमके कारण काय? त्यांची पूर्वी ओळख होती का? त्याने शेळ्या-मेंढ्या चोरीचा प्रयत्न केला होता का? अशा अनेक कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.