बांबवडे : वारणा नदीच्या शित्तूर आरळा पुलावरून वारणेच्या पुराच्या पाण्यात पडलेल्या एका व्यक्तीस जिवाची बाजी लावून सुखरूप बाहेर काढले. हि घटना दुपारी साडेबारा वाजता घडली.
या बाबत आधिक माहिती अशी की, गेली दहा-बारा दिवस वाहतूकीस बंद असलेला वारणा नदीवरील शित्तूर आरळा पुल सोमवार पासून वाहतूकीस सुरू झाला. शितूर येथील अमोल धडाम व त्याचा मित्र शंकर चौगले हे आरळा येथून आपल्या गावी जात असताना शित्तूर पुलावर आले असता पुराच्या पाण्यातून कोणी तरी वाहत जात असल्याचे त्यांना दिसले.
अमोल व शंकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता पुलावरून पाण्यात उड्या मारल्या आणि वाहत जाणाऱ्या व्यक्तीला त्यांनी सुखरूप बाहेर काढले. पाण्यातून सुखरूप बाहेर पडलेल्या व्यक्तीचे नाव विठ्ठल यशवंत ढवळे (रा. शितूर पैकी ढवळेवाडी) असे असून त्यांना डोळ्यांनी कमी दिसते.
आरळा येथे जात असतांना त्यांचा पुराच्या पाण्यात तोल जाऊन ते पडले होते. वारणा नदीच्या पायथ्यास शित्तूर पुल असल्याने पाण्याचा प्रवाह जोराचा असतो, पाण्यात पडलेल्या विट्टल ढवळे यांना प्राणांची बाजी लाऊन त्यांचा जीव वाचवणाऱ्या अमोल धडाम, शंकर चौगले यांचे अभिनंदन होत आहे.