

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या 63 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरुपद रिक्त राहिले असून, हे शिक्षण क्षेत्रासाठी भूषणावह नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर रोजी संपला. त्यानंतर 9 ऑक्टोबरपर्यंत नवीन प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली नसल्याने आ. पाटील यांनी समाज माध्यमांवर ट्विट करून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यपाल तथा कुलपती यांनी तत्काळ प्रभारी कुलगुरू नेमणे अपेक्षित असते. मात्र, अद्याप कोणताही आदेश निघालेला नसल्याने प्रशासन संभ्रमात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का? शिक्षणाबाबतची ही अनास्था महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांप्रति अन्याय आहे. ज्या दिवशी कुलगुरूंची निवड होते, त्याच दिवशी त्यांच्या कार्यकाळाची समाप्ती तारीख ठरलेली असते. मग, वेळेवर पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया का झाली नाही? व किमान प्रभारी कुलगुरूसुद्धा का नेमण्यात आले नाहीत? राज्यपाल कार्यालय व उच्च शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे, असे आ. पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र
कुलगुरुपद पहिल्यांदाच रिकामे राहिल्याने ‘कुठे नेऊन ठेवणार आहात आमचा महाराष्ट्र?’ असा सवाल आ. पाटील यांनी राज्य सरकारला केला आहे. राजभवनाकडून कोणताही निरोप अद्याप नसल्याने विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचार्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.