Pratapsinh Jadhav 80th Birthday | जनतेचे ऋण ही माझ्या मर्मबंधातली ठेव : डॉ. प्रतापसिंह जाधव

Pratapsinh Jadhav 80th Birthday
कोल्हापूर : पत्रमहर्षी पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव सहस्रचंद्रदर्शन सोहळा नागरी गौरव समितीच्या वतीने डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. जाधव यांच्या ‘सिंहायन’ या आत्मचरित्र ग्रंथाचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार. यावेळी उपस्थित डावीकडून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, गृह राज्यमंत्री योगेश कदम, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार डॉ. विनय कोरे, कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, डॉ. प्रतापसिंह जाधव, ऋतुराज मंदार पाटील, सौ. शीतल मंदार पाटील, राजवीर जाधव, सौ. गीतादेवी जाधव, सौ. स्मिता योगेश जाधव, डॉ. योगेश जाधव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, गौरव समितीचे अध्यक्ष व खासदार शाहू महाराज, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, महाराष्ट्र राज्य स्वयं-पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, खासदार धनंजय महाडिक, आ. राहुल आवाडे आदी.
Published on
Updated on

कोल्हापूर : जनतेच्या ऋणातून मुक्त व्हावं, असं आपल्याला वाटत नाही. कारण, हे ऋण म्हणजे आपल्या मर्मबंधातली ठेव आहे. आज वयाच्या 80 व्या वर्षी माध्यमातील बदलांकडे पाहताना अनेक गोष्टी आठवतात. आज डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेत आमूलाग्र बदल झाला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय. डीपफेक न्यूजचं पेवच फुटलंय. मात्र, विश्वासार्हता हाच पत्रकारितेचा आत्मा असून, हे शाश्वत मूल्य बदलत नाही याचे भान ठेवा, अशा शब्दांत ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या गौरवाला उत्तर दिले.

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा

बकुल फुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा’

हे गोविंदाग्रजांचे गौरवगीत कोल्हापूरला तंतोतंत लागू पडते. कारण, कोल्हापुरी माणूस रोखठोक आहे, असेही डॉ. जाधव म्हणाले.

माझे वडील पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव तथा आबा व आई इंदिरादेवी हे दोघे माझ्या जीवनाचे शिल्पकार आहेत. माझ्या कुटुंबीयांचे पाठबळ माझ्या वाटचालीत लाभलं. 80 वर्षांच्या वाटचालीत आई-वडिलांच्या आणि देव-देवतांच्या आशीर्वादामुळे आणि ‘पुढारी’च्या लाखो वाचक आणि हितचिंतकांच्या पाठिंब्यानेच आपण हे कार्य करू शकलो, असे गौरवोद्गार काढून डॉ. जाधव म्हणाले की, डॉ. ग. गो. जाधव यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत स्वातंत्र्य व दलित चळवळीत काम केले. त्यावेळी मुंबईत त्यांना भास्करराव जाधव, मामा वरेरकर, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांचा सहवास लाभला. त्यांनी मुंबईत ‘कैवारी’ हे वृत्तपत्र सुरू केले. मात्र, स्वातंत्र्य चळवळीत बंदी आल्यानंतर ते कोल्हापूरला आले.

1939 साली डॉ. ग. गो. जाधव यांनी मोठ्या कष्टाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ‘पुढारी’ची स्थापना करून पत्रकार, स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक अशा भूमिका वठविल्या. 1949 साली ते कोल्हापूरचे पहिले आमदार होते; पण स्वातंत्र्य चळवळीचा, समाजसुधारकाचा, पत्रकारितेचा आणि राजकीय वारसा असतानाही त्यांनी राजकारणाचा मोह टाळून पत्रकारितेचे खडतर व्रत स्वीकारले आणि ते निःपक्ष आणि स्वतंत्र बाण्याचं राहण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला ते बांधलं नाही. म्हणूनच ‘पुढारी’ हा ‘पुढारी’च राहिला.

पुढे राहून नेतृत्व करतो तो पुढारी

स्व. मोतीलाल नेहरू यांच्या ‘दि लीडर’ वृत्तपत्रावरून डॉ. ग. गो. जाधव यांनी ‘पुढारी’ हे नाव वृत्तपत्रासाठी घेतले. ‘पुढारी’ हा शब्द नेता या संस्कृत भाषेतील शब्दाचा समानार्थी शब्द आहे. जो अनुयायांना आपल्याबरोबर घेऊन जातो तो नेता आणि अनुयायांच्या बरोबर न राहता पुढे राहून नेतृत्व करतो तो ‘पुढारी’. इंग्रजीमध्ये त्याला ‘लिडिंग फ्रॉम द फ्रंट’ म्हणतात. हा नेता आणि पुढारी यामधला फरक आहे. आपण व्यासपीठावरील सर्व राजकीय नेतेमंडळी नेते जरूर आहात. मी मात्र पुढारी आहे.

‘पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती

होऊनिया बेहोश धावलो ध्येयपथावरती’

म्हणत आपण पत्रकारिता केली. कारण,

‘खिंचो न कमान को, न तलवार निकालो,

जब तोप मुकाबिल हो, तो अखबार निकालो’

या न्यायाने आपण संपादक या नात्याने चौथ्या स्तंभाची जबाबदारी प्रांजळपणे पार पाडत आहे. सर्वच पक्षांच्या चुकीच्या धोरणावर व निर्णयावर टीकेचे प्रहार करीत अंकुश ठेवण्याचे कर्तव्य पार पाडताना कसूर केली नाही, असेही डॉ. जाधव म्हणाले.

‘पुढारी’ हा श्वास आहे आणि पत्रकारिता हा ध्यास आहे, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले की, ‘पुढारी’चे रूपांतर एका जिल्हा वृत्तपत्रापासून ते देशातील अग्रगण्य ‘पुढारी’ माध्यम समूहामध्ये करू शकलो. यामध्ये माझे सुपुत्र योगेश यांचे मोठे योगदान आहे, हे मी अभिमानाने सांगतो. कारण, अडचणीवर मात करून कष्टानंच यश मिळवावं लागतं.

‘सफलता का सफर काँटो भरा जरूर है ।

पर हर सुबह का सूरज

अंधेरे से लडकर आता है ॥’

असेही डॉ. जाधव म्हणाले.

आता खंडपीठ व्हावे

विधायक पत्रकारिता करताना शाहू जन्मशताब्दीला शाहू स्मारक भवन उभारले. जोतिबा मंदिर परिसर विकास व तीर्थक्षेत्र विकास आराखडा मूर्त स्वरूपात आणला. खंडपीठासाठी 50 वर्षे उठविलेल्या आवाजानंतर आताचे सरन्यायाधीश भूषण गवई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सर्किट बेंच साकार झाल्याचे सांगून डॉ. जाधव यांनी आता सर्किट बेंचचे खंडपीठ व्हावे, अशी मागणी केली. जगातील सर्वोच्च रणभूमीवर उभारलेल्या सियाचीन हॉस्पिटलची देखभाल गेली 25 वर्षे ‘पुढारी’ करीत आहे. कोल्हापूरकरांनी सियाचीन हॉस्पिटल उभारून कोल्हापूरचा झेंडा हिमालयावर फडकवला आहे.

‘आम्ही काही केले नाही । केले तुवां गोविंदा ॥

आम्ही म्हणवू सेवक तुझे । हेचि आम्हांसी साजे ॥’

‘जर्नालिस्ट मे गेट टायर्ड, बट नेव्हर रिटायर्ड’, असे म्हटले जाते. हाडाचा पत्रकार कधी मनाने निवृत्त होत नाही, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले की, मागे वळून पाहताना थक्क व्हायला होतं. केवढा हा आयुष्याचा प्रवास. मी सिंहाच्या चालीने आयुष्यभर चालत राहिलो. यापुढेही वाटचाल याच दिमाखात सुरू राहील. इंग्लिश कवी रॉबर्ट फ्रॉस्टची कविता माझ्या वाटचालीत नेहमीच प्रेरणा देत आली आहे.

Woods are lovely dark and deep

But I have promises to keep

And miles to go before I sleep.

‘सिंहायन’ म्हणजे सिंहाचे मार्गक्रमण

‘अयन’ म्हणजे मार्गक्रमण. ‘सिंहायन’ म्हणजे सिंहाचे मार्गक्रमण. मला काही सांगायचे आहे, हे लक्षात आल्यानंतर आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय आपण घेतला. आपल्या 80 वर्षांच्या वाटचालीचा लेखाजोखा ‘सिंहायन’ या आत्मचरित्रात मांडला आहे. ‘पुढारी’चा संपादक म्हणून 50 वर्षांहून अधिक काळ लोकशिक्षणाचे काम करीत आहे. त्यामुळे या आत्मचरित्रात वैयक्तिक जीवनातील घडामोडींपेक्षा गेल्या 50-60 वर्षांत राजकीय, सामाजिक घटनांचा परामर्श घेतला आहे. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण ते आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतचा सर्व राजकीय घडामोडींचा ताळेबंद या आत्मचरित्रात पाहायला मिळेल. वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांच्या आताच्या बदलत्या प्रवाहांचा साक्षेपी वेध घेणारे ‘सिंहायन’ हे पहिलेच आत्मकथन असेल, असेही डॉ. जाधव म्हणाले.

पंचगंगेने तलवारीची धार माझ्या लेखणीला दिली

कोल्हापूर नगरीत माझा जन्म झाला. येथील पंचगंगेच्या पाण्यात जशी रग आहे, तशी धगही आहे. या पंचगंगेच्या पाण्याने आणि करवीरच्या तांबड्या मातीने मला अन्यायाशी झुंजण्याची, तसेच ताठ मानेने आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. निर्भीड पत्रकारितेसाठी लागणारी तलवारीची धार माझ्या लेखणीला दिली. आम्ही कोल्हापूरकर कोणी ‘अरे’ म्हटलं तर त्याला लगेच ‘कारे’ म्हणून शड्डू ठोकणारच, असे डॉ. जाधव म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

गुळाचा गोडवा आणि लवंगी मिरचीचा ठसका

कोल्हापुरी माणूस रोखठोक आहे. त्याच्यात ज्याप्रमाणे गुळाचा गोडवा आहे, त्याप्रमाणे लवंगी मिरचीचा ठसकाही आहे. हे दोन्ही परस्परविरोधी गुण त्याच्या स्वभावात गुण्यागोविंदाने नांदतात. कोल्हापूरचा गूळ, लवंगी मिरची, तांबडा-पांढरा, कोल्हापुरी फेटा आणि कोल्हापुरी पायताण यासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. यातल्या प्रत्येक गोष्टीचा वापर कुठं आणि कसा करायचा हे कोल्हापुरी माणसाकडून शिकण्यासारखे असल्याचे डॉ. जाधव म्हणाले.

पत्रकारितेचा आत्मा म्हणजे विश्वासार्हता

‘पुढारी’च्या वर्धापन दिनाचे रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव, हीरकमहोत्सव आणि अमृतमहोत्सव साजरा करण्याचं भाग्य मला ईश्वराच्या कृपेनं लाभलं. माझ्या या पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक स्थित्यंतरं मी अनुभवली. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांचा आता प्रचंड विस्फोट झाला आहे. आताच्या डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेत आमूलाग्र बदल झाला आहे. पूर्वी वृत्तपत्रात काम करणारेच पत्रकार होते. आता मोबाईलच्या युगात तुम्ही सर्वजण पत्रकार झाला आहात. मोबाईलवर, व्हॉटस्अपवर, यूट्यूबवर तुम्ही मजकूर बघता आणि पुढे पाठविता. काही वेळा स्वतःच पत्रकार होऊन व्हिडीओ तयार करता आणि लगेच व्हायरलही करता. सध्याच्या युगात सर्वजणच पत्रकार झालेले आहेत. हे प्रचंड मोठं स्थित्यंतर मी माझ्या या प्रदीर्घ वाटचालीत पाहिल्याचं सांगून डॉ. जाधव म्हणाले की, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए.आय. आलंय. डीपफेक न्यूजचं पेव फुटलंय. काळाप्रमाणे माध्यमांची आयुधं बदलत राहतील. मात्र पत्रकारितेचा आत्मा म्हणजे विश्वासार्हता हे शाश्वत मूल्य बदलत नाही याचं भान ठेवा.

शिव, शाहू, फुले, आंबेडकर स्फूर्तिस्थाने

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू छत्रपती, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही माझी स्फूर्तिस्थाने आहेत. जगन्माता तुळजाभवानी, आई अंबाबाई व जोतिबा या दैवतांना मी वंदन करतो, अशा शब्दांत डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.

‘पुढारी’ कोल्हापूरचं रोखठोक प्रतिबिंब

कोल्हापूर कुस्तीची पंढरी आहे. त्याचबरोबर कोल्हापूरने साहित्यिक आणि शास्त्रज्ञही देशाला दिले आहेत. कोल्हापूरचे हे विविधांगी व्यक्तिमत्त्व कोल्हापुरी मिसळसारखं चमचमीत आहे. त्यामुळे कोल्हापूरचं हे रोखठोक प्रतिबिंब कोल्हापुरात जन्मलेल्या ‘पुढारी’मधून उमटणारच, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

ऋणी मी, कृतज्ञ मी

माझ्यावरील प्रेमापोटी आज आपण सर्वजण या समारंभाला उपस्थित आहात. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद या माझ्यासाठी लाखमोलाच्या आहेत. त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे, कृतज्ञ आहे. आपण आपला वाढदिवस सार्वजनिकरीत्या कधीच साजरा केला नाही. आज पहिल्यांदाच माझा वाढदिवस साजरा होत आहे. आपल्या या ऋणातून मुक्त व्हावे, असे मला कधी वाटत नाही. तुमचं हे ऋण माझ्यासाठी मर्मबंधातली ठेव आहे, असे उद्गार डॉ. जाधव यांनी काढले.

जनतेबरोबर राहणारा लढवय्या पत्रकार

1969 साली ‘पुढारी’च्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चार भिंतींआड बसून कधीच पत्रकारिता केली नाही. प्रत्येक प्रश्नात जनतेबरोबर रस्त्यावर उतरून लढा देणारा मी लढवय्या पत्रकार आहे. सीमालढा, ऊस आंदोलन, टोलविरोधी लढा, मराठा आरक्षणाचा लढा या सर्व लढ्यांत फक्त लेखणीद्वारे नव्हे, तर जनतेबरोबर लढ्याचे नेतृत्व केले. सीमालढ्यात काही नेते प्रवेशबंदी असताना वेशांतर करून बेळगावला पोहोचले. मलाही कन्नड नेत्यांनी बंदी केली होती. मी मात्र उघड्या जीपमधून बेळगावला जाऊन जाहीर सभा घेतली, हा माझा लढवय्या बाणा लढाऊ पत्रकारिता असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news