

कोल्हापूर : राधानगरी धरणाला पुढील वर्षी नवे दरवाजे बसविण्यात येणार आहेत. धरणाला बसविण्यात येणार्या हायड्रोलिक हॉईस तंत्रज्ञानावरील आधारित तीन व रेडियल गेट (वक्राकार) तीन अशा सहा दरवाजांचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. हे डिझाईन पुढील आठवड्यात राज्य शासनाच्या तांत्रिक समितीकडे पाठविण्यात येणार आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा धोका असतो. या दोन्ही जिल्ह्यांतील महापुरावर नियंत्रण ठेवता यावे, याकरिता राज्य शासन जागतिक बँकेच्या मदतीने उपाययोजना करण्यासाठी ‘महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ (एमआरडीपी) राबवत आहे. या प्रकल्पांतर्गत राधानगरी धरणाचे दरवाजे बदलण्यात येणार आहेत.
धरणाच्या मुख्य भिंतीला पाच दरवाजे आहेत. त्यापैकी दोन दरवाजे वीजगृहासाठी वापरले जातात. उर्वरित तीन दरवाजे बदलण्यात येणार असून, त्या ठिकाणी हायड्रोलिक हॉईस तंत्रज्ञानाचे, तर स्वयंचलित दरवाजांशेजारी तीन रेडियल गेट (वक्राकार दरवाजे) बसविण्यात येणार आहेत. या सहाही दरवाजांचे डिझाईन तयार झाले आहे.
हे डिझाईन पुढील आठवड्यात राज्य तांत्रिक समितीला सादर होणार आहे. या समितीने डिझाईनला मान्यता दिल्यानंतर ते राज्य शासनाच्या स्टेअरिंग कमिटीकडे जाईल. त्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे, त्यानंतर प्रत्यक्ष दरवाजे बसविण्याचे काम सुरू होईल.
राधानगरी धरणाला असलेले सात स्वयंचलित दरवाजे हीच या धरणाची ओळख आहे. स्वयंचलित दरवाजांमुळे राधानगरी धरण संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. धरणाची ही ओळखही कायम ठेवली जाणार आहे. हे स्वयंचलित दरवाजे बदलण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले.
राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांतून प्रत्येकी 1,428 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतो. धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे खुले झाले तर 9,996 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतो. मात्र, 2019 साली याच धरणाचे मुख्य दरवाजेही खुले करण्यात आले होते. त्याद्वारे सर्वाधिक 17 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणातून झाला होता.