

कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक, पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त ‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ बुधवारी लोकोत्सवाच्या स्वरूपात साजरा होणार आहे. या दिमाखदार सोहळ्यासाठी पोलिस परेड ग्राऊंडवर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित भव्य डोम उभारण्यात आला आहे.
या सोहळ्यासाठी उभारण्यात आलेला मंडप हा केवळ भव्यतेतच नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या द़ृष्टीनेही आगळावेगळा आहे. 132 फूट बाय 400 फूट आकाराचा हा मंडप ‘जर्मन हँगर टेक्नॉलॉजी’वर उभारण्यात आला असून, मोठ्या राजकीय सभांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉन्सर्टपर्यंत वापरल्या जाणार्या दर्जेदार डिझाईनचा तो नमुना आहे. येथे 100 फूट बाय 80 फूट अशा विशाल व्यासपीठावर हा सोहळा संपन्न होईल.
या व्यासपीठाच्या मागे 100 फुटांची भव्य एलईडी वॉल बसविण्यात आली आहे. त्यावरून संपूर्ण सोहळ्याचे थेट द़ृश्य प्रक्षेपित होणार असून, मंडपातील प्रत्येक प्रेक्षकाला समोरूनच सोहळ्याचे दर्शन घेण्याचा अनुभव मिळणार आहे. याशिवाय मंडपाच्या चारही कोपर्यांत चार मोठ्या एलईडी स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे हजारो नागरिकांना कार्यक्रमाचे प्रत्येक क्षणचित्र स्पष्टपणे पाहता येणार आहेत. मंडपातील आसनरचना, ध्वनी व्यवस्था आणि प्रकाशयोजना या सर्व गोष्टींची रचना मोठ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्या मानाने करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी सुरक्षितता आणि शिस्तीचा विशेष विचार करून सेफ्टी, इमर्जन्सी एक्झिटस् आणि हवेशीर व्यवस्थाही केली गेली आहे.
‘जर्मन हँगर टेक्नॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संरचनात्मक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या राजकीय सभांपासून ते आंतरराष्ट्रीय संगीत कॉन्सर्टस्, एव्हिएशन शो, औद्योगिक प्रदर्शने आणि क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्यांसाठी केला जातो. ‘जर्मन हँगर टेक्नॉलॉजी’ म्हणजे अत्याधुनिक अॅल्युमिनियम फ—ेम्स आणि फ्लेक्स फॅबि—कवर आधारित मॉड्युलर स्ट्रक्चर. यामध्ये मोठ्या जागेतही खांबांशिवाय प्रशस्त छत तयार करता येते. वारा, ऊन, पाऊस यांसारख्या हवामानातील बदलांना तो सहज तोंड देतो. त्यामुळे मंडपात वातानुकूल वातावरण टिकते, ध्वनी परावर्तन कमी होते आणि प्रकाशयोजनेसाठी उत्तम परावर्तक पृष्ठभाग तयार होतो.