कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी (दि. 2) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. यांसह राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. यानिमित्त सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रविवारी दुपारी मुर्मू यांच्या दौर्याची रंगीत तालीम घेण्यात आली. कित्येक वर्षांनंतर राष्ट्रपती कोल्हापूर दौर्यावर येत असल्याने याबाबत उत्सुकता आहे.
सोमवारी सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी त्यांचे विशेष विमानाने कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी त्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येतील. दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी त्या अंबाबाई मंदिरातून शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतील. 12 वाजून 55 मिनिटे ते दुपारी तीन वाजेपर्यंत त्या शासकीय विश्रामगृहावर असतील.
दुपारी तीन वाजता त्या शासकीय विश्रामगृहावरून वारणानगर येथे होणार्या श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समूहांचा सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठाचा उद्घाटन सोहळ्यासाठी रवाना होतील. दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी त्या वारणानगरहून कोल्हापूर विमानतळाकडे रवाना होणार आहेत. सायंकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी त्या विशेष विमानाने पुण्याकडे रवाना होणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांच्या दौर्यानिमित्त विमानतळ ते अंबाबाई मंदिर, शासकीय विश्रामगृह तसेच शासकीय विश्रामगृह ते वारणानगर आणि वारणानगर ते विमानतळ या मार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या दौर्यादरम्यान शहरातील विविध मार्ग काही काळाकरिता बंद करण्यात आले आहेत. काही एकेरी मार्ग खुले करण्यात आले आहेत तर काही मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन सर्वसामान्य भाविकांसाठी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे सोमवारी सकाळी 11 वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी 2 वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. सकाळी 11 वाजता केेंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचेही आगमन होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित राहणार आहेत.