

कोल्हापूर : कोल्हापूरच्या मातीचा सुवास, राजर्षी छत्रपती शाहूरायांचा विचार आणि पत्रकारितेचं अधिष्ठान दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटले आहे. ‘पुढारी’ हे केवळ वृत्तपत्र नाही, तर महाराष्ट्राच्या मनामनात प्रकाश देणारा दीपस्तंभ आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा गौरव केला. सत्तेला आरसा दाखवण्याबरोबर अन्यायाविरुद्ध लढणारे डॉ. जाधव यांनी कोल्हापूर आणि सामान्य जनतेसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. टोल नाके हटविण्यापासून सीमावादाच्या लढ्यापर्यंत, जनतेच्या विविध प्रश्नांवर त्यांनी कायम आवाज उठवला, असेही शिंदे म्हणाले.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून जाधव यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्याशी असलेल्या आत्मीय नात्याचाही विशेष उल्लेख केला. शिंदे पुढे म्हणाले, सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा हा पारिवारिक सोहळा असतो परंतु डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या या कार्यक्रमाला उपस्थिती पाहिल्यानंतर त्यांचा परिवार किती मोठा आहे ते दिसून येते. तसेच त्यांची लोकप्रियताही दिसून येते. डॉ. जाधव यांनी संपुर्ण कोल्हापूरकरांवर अगदी कुटुंबाप्रमाणे प्रेम केलं आणि भविष्यातही ते करतील, असा विर्श्वास असल्यामुळे संपूर्ण कोल्हापूर या कार्यक्रमासाठी अवतरलं असल्याचे दिसते. या सोहळ्याला अर्धे मंत्रीमंडळ देखील उपस्थित आहेत. विरोधी पक्षातील नेतेही आहेत. या सर्वांना एकत्र आणण्याची जादू डॉ. जाधव यांनी केली आहे.
कोल्हापूरच्या जडणघडणीत डॉ. जाधव यांच्या योगदानाबद्दल अनेक वक्त्यांनी चर्चा केली. त्यावरून पुढारी म्हणजे कोल्हापूर असे समिकरणच बनल्याचे दिसते. कोल्हापूरच्या प्रत्येक जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. कोल्हापूरचा टोल डॉ. जाधव यांच्या आग्रहामुळेच रद्द झाला. त्यांच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी नागरी स्वागत समितीने केलेला हा छोटासा प्रयत्न असावा, असे आपले मत आहे. डॉ. जाधव यांचा हा गौरव सोहळा पाहून त्यांचे वडील स्वर्गीय डॉ. ग. गो. जाधव यांनाही आनंद झाला असेल. अभिमान वाटत असेल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्वर्गीय डॉ. ग. गो. जाधव यांच्या कार्याबद्दल बोलतान ते म्हणाले, डॉ. ग. गो. जाधव नुसते विचारवंत नव्हते तर त्यांनी आपल्या लेखणीच्या सामर्थ्यावर समाजप्रबोधन केले. लेखणीच्या जोरावर त्यांनी क्रांती घडविली आहे. विशेषत: गोरगरीब तळागाळातील मुलांच्या शिक्षणावर त्यांचा भर होता. त्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत काम केले. डॉ. प्रतापसिंह जाधव देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या लेखणीला सामाजिक चवळवळीचे प्रमुख हत्यार बनविले. वडिलांचा वैभवशाली वारसा पुढे नेण्याचे काम ते करत आहेत. पत्रकारतिचे व्रत स्वीकारत सत्यशोधक चळवळीतून 1937 मध्ये ग. गो. जाधव यांनी पुढारी सुरू केला. त्याचे डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी वटवृक्षामध्ये रुपांतर केले. हे करत असताना डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पत्रकारितेशी कोणतीही तडजोड केली नाही. एवढेच नव्हे तर पत्रकारितेचा मिडिया झाला पण सर्वसामान्यांशी नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. हे काम सोपं नाही परंतू डॉ. जाधव यांनी ते काम निरपेक्ष भावनेने करत पुढारीचा प्रसार केला. त्यामुळेच दैनिक पुढारी हा दिपस्तंभ बनला आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सिंहायनफमध्ये डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा जीवनपट मांडण्यात आला आहे. ते वाचल्यानंतर डॉ. जाधव नावाच्या व्यक्तीमत्वाची प्रचिती येते. सिंहाने गर्जना दिली की समोरच्याचे काय होते हे आपल्याला माहित आहे. त्याप्रमाणे डॉ. जाधव यांनी एखाद्या प्रश्नांबाबत भूमिका घेतली की समोरच्याचे काय होत असेल हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळेच त्यांचा दबदबा निर्माण झाला आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सन 2013 मध्ये आपण पंतप्रधान व्हाल, असे नरेंद्र मोदी यांना सांगितले होते. यावरून त्यांचा सखोल राजकीय अभ्यास दिसून येतो. पुढे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी डॉ. जाधव यांना फोन करून यांनी, राजकीय अभ्यास करून अंदाज सांगणारे तुम्ही देशातले एकमेव संपादक आहे असे आवर्जून सांगितल होते. असेही शिंदे म्हणाले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले, या दोघांमध्ये खूप साम्य होते. दोघांची भाषा तलवारीसारखी. दोघेही अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे प्रसंगी रस्त्यावर उतरणारे. त्यांची खूप चांगली मैत्री होती. सीमा प्रश्नी दोघेांचे एकच विचार, एकच मद, त्यांच्यापुढे बोलण्याचे धाडस कोणी दाखवत नाही. कोल्हापुरात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक खरा पुढारी अवतरला आहे. असे ठाकरे म्हणायाचे. एका प्रकरणामध्ये कारवाई करण्याचा प्रसंग आला होता. त्यावेळी बाळासोहब ठाकरे यांनी हिम्मत असेल तर कारवाई करून दाखवा, असे सांगितले होते. दोन बाळासाहेब (म्हणजे बाळासाहेब ठाकरे व बाळासाहेब जाधव) एकत्र आल्यानंतर विस्तवाशी कोण पंगा घेईल, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी स्वत:साठी कधी काही मागितले नाही. मुख्यमंत्री पदाच्या काळात ज्या ज्या वेळी मला भेटले त्यावेळी समाजाची कामे घेऊनच ते येत असते. गुजरातचा भूंकंप असो, लातूरचा भूकंप असो अनेक ठिकाणी डॉ. जाधव यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सियाचीनमध्ये बांधण्यात आलेल्या हॉस्पिटलमुळे तर जवानांसाठी नव संजिवनीच मिळाली आहे. त्यामुळे ते केवळ रुग्णालय नाही तर मानवतेचे मंदिर बनले आहे. ही कामगिरी सोपी नाही ती कोल्हापूरच्या डॉ. प्रतापसिंह जाधव नावाच्या लढवय्याने करून दाखविली आहे. असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहूरायांच्या विचाराचा वारसा पुढे नेणारे डॉ. जाधव केवळ आपले वर्तमानपत्र चालवून थांबले नाहीत तर रचनात्मक पत्रकारतिही त्यांनी केली आहे. लाखो वाचकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणात सर्व क्षेत्रांमध्ये पुढारीने आपले पुढारपण सिद्ध करून दाखवलेले आहे. राजकारणात कितीतरी पुढारी आले आणि गेले पण हा पुढारी तसाच खंबीरपणे, ठामपणे दिपस्तंभासारखा उभा आहे. समाजाला मार्गदर्शन करणारा हा पुढारी आहे आभार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.