कोल्हापूर ः विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारांबरोबरच राजकीय पक्षही अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. सध्याच्या विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार आणि ठाकरे शिवसेनेची पाटी कोरी असल्याने त्यांना खाते उघडण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, तर काँग्रेस व शिंदे शिवसेनेचा बळ वाढविण्यासाठी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा बळ टिकविण्यासाठी संघर्ष सुरू आहे. जनसुराज्य शक्ती, राजर्षी शाहू आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे पक्ष आपले अस्तित्व टिकविण्यासाठी झगडत आहेत. भाजप सध्या शून्यावर आहे.
सध्याच्या विधानसभेत काँग्रेसचे चार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन, शिंदे शिवसेनेचा एक, ताराराणी पक्ष व जनसुराज्य शक्ती (भाजप सहयोगी) प्रत्येकी एक, अपक्ष शिंदे शिवसेना सहयोगी एक असे सध्याचे बल आहे. काँग्रेसने दहा पैकी पाच जागांवर आपले उमेदवार उभे केले आहे. भाजपचे दोन ठिकाणी उमेदवार उभे आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तीन तर अजित पवार गटाचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे दोन, शिंदे गटाचे तीन, जनसुराज्य शक्ती पक्षाचे दोन, राजर्षी शाहू आघाडी एक, स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन यासह अन्य राजकीय पक्ष रिंगणात आहेत.
काँग्रेसचे चार आमदार असून पाचव्या जागेसाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादीचे दोन आमदार विजयी झाले होते. ते दोघेही राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जिल्ह्यात आपले खाते उघडावे लागणार आहे. अजित पवार गटासमोर ताकद कायम राखण्याचे आव्हान आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 2019 च्या निवडणुकीत भाजपमुक्त झाला. आता भाजपला आपले अस्तित्व निर्माण करायचे आहे. दोन जागांवर त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे दहा पैकी सहा आमदार निवडून आले होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत केवळ एकमेव आमदाराने आपली जागा राखली. ते सत्ताबदलाच्या राजकारणात शिंदे शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरे शिवसेना जिल्ह्यात शून्यावर आली. आता दोन जागांवर लढणार्या शिवसेनेला जिल्ह्यात आपले खाते पुन्हा उघडायचे आहे.
जनसुराज्य पक्षाच्या स्थापनेवेळीच जिल्ह्यात तीन जागांवर त्यांनी यश मिळविले. मात्र सध्याच्या विधानसभेत त्यांचा एकच आमदार असून त्यांनीही आता दुसरी जागा महायुतीत जागा वाटपात लढून मिळविली आहे. आता या दोन्ही जागांवरचा विजय हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. भाजपनेही चंदगडला बंडखोरी केली आहे. त्याशिवाय बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष, लोकराज्य जनता पार्टी, मनसे, देश जनहित पक्ष यांच्यासह अपक्ष मिळून 121 उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत दोन पैकी एक जागा काँग्रेसला दुसरी जागा शिंदे शिवसेनेला मिळाली.
जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणात नेते अनेक संस्थांमध्ये एकत्र आहेत. काही वेळा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत या राजकारणाचा सहानुभूती म्हणून उपयोग होता. मात्र, जनसुराज्य शक्ती पक्षाने करवीर, चंदगड येथे बंडखोरी केली असून तेथे स्थानिक नेत्यांना त्यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे सहकाराच्या राजकारणात संघर्षाची नांदी झाली आहे.
काँग्रेस 4
राष्ट्रवादी अजित पवार 2
शिंदे शिवसेना 1
जनसुराज्य, ताराराणी पक्ष
(भाजप सहयोगी ) प्रत्येकी एक 2
अपक्ष शिंदे शिवसेना 1