

कोल्हापूर : पीडित महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन अत्याचार करणार्या चंदगड पोलिस ठाण्यातील हवालदार सुनील बळीराम कुंभार ( वय 47, रा. तळसंदे) याला रविवारी रात्री निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी ही माहिती दिली. कुंभार याच्याविरुद्ध शनिवारी गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पीडिता वर्षापूर्वी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आली होती. संबंधित गुन्ह्याचा तपास हवालदार कुंभार याच्याकडे होता. ओळखीचा फायदा घेत त्याने पीडितेशी सलगी वाढविली. त्यातून त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. आयुष्यभर सांभाळतो, अशी भलावण करून संशयिताने वारंवार अत्याचार केल्याचे पीडितेने गांधीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताने लग्नास नकार देऊन पीडित महिलेला मारहाण केली होती. पोलिस हवालदार कुंभार याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच रविवारी रात्री त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.