कोल्हापूर : चैनीसाठी घरफोडी करणार्या दोन आंतरराज्य घरफोड्यांना पोलिसांनी अटक केली. विक्रम ऊर्फ राजू बाळू कित्तूरकर (वय 31) व महादेव नारायण धामणीकर (दोघेही रा. हालशी, ता. खानापूर, जि. बेळगाव, कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत. घरफोड्यांतील तब्बल 1 किलो 200 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 किलो 430 ग्रॅम चांदीचे दागिने, असा एकूण 86 लाख 26 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
पंडित म्हणाले, पोलिस निरीक्षक कळमकर यांनी वाढत्या घरफोड्या रोखण्यासाठी पथके तयार करून, गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन भौगोलिक स्थिती, गुन्हा करण्याची पद्धत याची माहिती घेण्याची सूचना केली होती. हा तपास करत असताना कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक गुन्हा विक्रम कित्तूरकर याने त्याच्या साथीदारांसह केल्याचे आढळून आले.
पोलिस निरीक्षक कळमकर यांना कित्तूरकर हा घरफोडीतील दागिने विक्री करण्यासाठी मुरगूड ते सिद्धनेर्ली रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार 19 ऑगस्ट रोजी पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव, हिंदुराव केसरे, सुरेश पाटील, समीर कांबळे, दीपक घोरपडे यांच्या पथकाने सापळा रचून कित्तूरकर याला अटक केली. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने व मोटारसायकल असा 88 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी कित्तूरकरकडे सखोल चौकशी केली असता, साथीदार धामणीकर याच्यासह त्याने आठ महिन्यांत अनेक घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी धामणीकर याला कर्नाटकात जाऊन अटक केली, असेही पोलिस अधीक्षक पंडित यांनी सांगितले.
कित्तूरकर व धामणीकर हे घरफोडीतील दागिने वाटून घेत होते. कित्तूरकर याच्याकडून त्याच्या वाटणीस आलेले चोरीचे दागिने फेडरल बँक, खानापूर येथे तारण ठेवलेले 233 ग्रॅम, तसेच धामणीकर याच्याकडून 694 ग्रॅम सोन्याचे व 450 ग्रॅम चांदीचे दागिने, तसेच मुथूट फिनकॉर्प खानापूर यांच्याकडील दागिने, गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकलींसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच कित्तूरकर याने मुथूट फिनकॉर्प खानापूर येथे चोरीचे तारण ठेवलेले 20 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोघेही संशयित फायनान्स कंपनीकडे दागिने तारण ठेवून गोव्यात जाऊन चैनी करत होते. दोघांकडून 13 घरफोड्या उघडकीस आल्या आहेत, असेही पोलिस अधीक्षक पंडित यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर उपस्थित होते.