Fake Notes Case | अबब...! रोज एक कोटीच्या बनावट नोटा छापण्याचे टार्गेट
सुनील कदम
कोल्हापूर : बनावट नोटा छापणारी कोल्हापुरातील टोळी वेळीच पकडली गेली नसती तर लवकरच राज्याच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची भीती होती. कारण टोळक्याने दररोज किमान एक कोटी रुपये मूल्यांचे बनावट चलन छापण्याची तयारी केली होती. ही तयारी भल्याभल्यांची मती गुंग करून टाकणारी आहे. बनावट नोटा तयार करण्यासाठी एआयचा वापर झाल्याचे तपासात उघड झाल्याचे समजते.
सहा महिन्यांपासून सराव!
पोलिसांच्या तपासातून या टोळीचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. या टोळीने बनावट नोटा छापण्याचा सराव जवळपास सहा महिन्यांपासून सुरू केला होता. मात्र कधी नोटा छपाईमध्ये जादा शाई जायची तर कधी कमी शाईमुळे नोटा फिकट रंगाच्या यायच्या, कधी नोटांमधील ताराच जुळल्या जात नव्हत्या तर कधी नोटांच्या डिझाईनमध्ये थोडाफार फरक राहून जायचा. पण या टोळक्याने आपले प्रयत्न कमी केले नव्हते. अखेर या टोळीला गेल्या महिनाभरात हुबेहूब बनावट नोटा छापण्यात यश आले आणि हळूहळू त्यांनी त्याचे वितरणही सुरू केले.
दररोज एक कोटीची तयारी!
बनावट नोटांची छपाई जमायला लागल्यानंतर या टोळक्याने दररोज किमान एक कोटी रुपयांचे बनावट चलन छापण्याची तयारी केली होती. त्यासाठी लागणारा कागद, शाई, डिझाईन, प्रिंटिंग मशिन, स्कॅनिंग मशिन अशी सगळी सिद्धता करून ठेवली होती. मात्र या टोळीपुढे सर्वात मोठी अडचण ही होती की त्याचे वितरण कसे करायचे? कारण या टोळीतील सगळेच या बाबतीत अनभिज्ञ होते. शेवटी एक लाख खर्या चलनाच्या बदल्यात तीन लाखांचे बनावट चलन एजंटांमार्फत बाजारात आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण त्यांच्या पहिल्या प्रयत्नातच ही मंडळी पोलिसांच्या हाती लागली, अन्यथा फार मोठा अनर्थ ओढवला असता. करोडो रुपयांचे बनावट चलन बाजारात दाखल झाले असते.
निवडणुकीत चांदी!
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातील काही मतदारसंघांमध्ये मतदारांना आमिष दाखविण्यासाठी वाटण्यात आलेल्या नोटांपैकी अनेक नोटा या बनावट असल्याची खुलेआम चर्चा सुरू झाली होती. पण देणारे आणि घेणारेही या बाबतीत चिडीचूप होते. यंदा नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा हंगाम बहरत चालला आहे. अशावेळी या बनावट नोटा सापडल्या नसत्या तर राज्यभर या नोटांना पाय फुटून कोट्यवधी रुपयांचे बनावट चलन बाजारात येऊन सगळीकडे आर्थिक अंदाधुंदी माजण्याचा धोका होता. मात्र वेळेपूर्वीच ही टोळी गजाआड झाल्याने हा धोका टळला.
यापूर्वीही अनेक घटना!
बनावट नोटा छपाईची अनेक प्रकरणे गेल्या दहा-बारा वर्षांत सांगली आणि कोल्हापूर परिसरात चव्हाट्यावर आली आहेत. जवळपास दहा वर्षांपूर्वी कुपवाड आणि इस्लामपूर येथे बनावट नोटा छापणार्या दोन टोळ्या मिळून आल्या होत्या. मिरज आणि कुरुंदवाड येथेही सात-आठ वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य मिळून आले होते. साधारणपणे मिरज, कोल्हापूर आणि बेळगाव परिसरातून वारंवार बनावट नोटांना वारंवार पाय फुटताना दिसतात. त्यामुळे या भागात अशा पद्धतीने बनावट नोटा छापण्याच्या कामात ‘तज्ज्ञ’ झालेले नेमके किती लोक आहेत, त्याचा खोलात जाऊन शोध घेण्याची आवश्यकता आहे.
इथेही ‘एआय’चा वापर!
या टोळीचा गेल्या अनेक दिवसांपासून हुबेहूब बनावट नोटा तयार करण्याचा प्रयत्न सुरू होता. पण कुठे ना कुठे त्यांची थोडीफार चूक राहून जायचीच. त्यासाठी या मंडळींनी बनावट नोटा बनवणारे काही व्हिडीओ पाहिले होते, यूट्यूबवर वेगवेगळी माहिती घेतली होती. संगणकावर रोज नवी शोधाशोध केली जात होती. अखेर ‘एआय’ नावाचे अत्याधुनिक हत्यार या लोकांच्या हाताला लागले आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना बनावट नोटा छापण्यात यश आले. एकीकडे विधायक कामासाठी एआयचा वापर होत असताना या तंत्रज्ञानाचा विघातक वापरही या निमित्ताने पुढे आला.

