कोल्हापूर : पोलिस असल्याचा बहाणा करून तोंडाला मास्क गुंडाळून बंगल्यात घुसलेल्या पिस्तूलधारी तरुणाने शाहूपुरी येथील चौथ्या गल्लीतील व्यापारी संदीप विश्वनाथ नष्टे यांच्यासह कुटुंबीयांना शिवीगाळ करून धमकावल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी रात्री घडला. संशयिताने 45 मिनिटांहून अधिक काळ कुटुंबीयांवर दहशत माजविली. या प्रकारामुळे शहरात विशेषत: व्यापारी वर्गात खळबळ माजली आहे. संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. शाहूपुरीसह प्रमुख चौक, मध्यवर्ती बस स्टँड, रेल्वे स्थानकासह व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, ताराराणी पुतळा चौक, तावडे हॉटेलसह महामार्गावरही पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र संशयिताचा सुगावा लागला नव्हता. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. संशयित सराईत गुन्हेगार असावा, असा संशय वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी व्यक्त केला. शाहूपुरीतील चौथ्या गल्लीत दत्त मंदिराजवळ हा प्रकार घडला. याबाबतची माहिती अशी, विश्वनाथ नष्टे व्यापारी म्हणून परिचित आहेत. त्यांचा मुलगा संदीप हे दसरा चौक परिसरातील एका मोबाईल शॉपीचे मालक आहेत. सोमवारी रात्री नष्टे कुटुंबीय बंगल्यात गप्पा मारत बसलेले असतानाच 30 ते 35 वर्षीय अनोळखी तरुणाने बंगल्यात घुसखोरी केली. संदीप नष्टे यांचेच घर आहे का, अशी त्याने विचारणा केली. त्यावर कुटुंबीयांनी संदीप अजून घरी आले नाहीत, असे सागताच संशयित काहीही न बोलता बाहेर गेला.
काही वेळाने संदीप घरी आल्यानंतर पाठोपाठ संशयितानेही तोंडावर मास्क लावून बंगल्यात घुसखोरी केली. मी पोलिस ठाण्यातून आलो आहे. तुमच्याविरुद्ध तक्रार आहे. तडजोड करून प्रकरण मिटवून घ्या, असे त्याने बजावले. नष्टे कुटुंबीयांनी कोणती तक्रार, कोणी केली आहे? तक्रारीचे स्वरूप काय, असे प्रश्न करताच संशयित गोंधळला. त्याच्या वर्तनाबद्दल नष्टे कुटुंबीयांना शंका आली. त्यांनी त्याचे नाव व पोलिस ठाण्याबाबत विचारणा केली. त्यावर त्याने केलेल्या भानगडी मिटवून घ्या, नाही तर प्रकरण सार्यांनाच महागात पडेल, अशी धमकीच दिली.
कुटुंबीयांकडून प्रश्नाचा भडीमार होताच भामट्याने शिवीगाळ सुरू केली. त्याने कमरेला लटकवलेले पिस्तूल काढून सर्वांवर रोखले. संदीप नष्टे यांच्यासह त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी व मुलांना हॉलमधील सोफ्यावर बसविले. आपण स्वत: पुढे बसून त्याने पिस्तूलच्या धाकावर दहशत माजवली. साधारणत: 40 ते 45 मिनिटे थरार सुरू होता.
हातात लोडेड पिस्तूल घेऊन संशयित इकडून तिकडे फिरवत होता. त्यामुळे नष्टे कुटुंबीय दहशतीखाली होते. संशयित मोठमोठ्या आवाजात शिवीगाळ करीत गोंधळ माजवत होता. नष्टे कुटुंबीयांनी प्रत्युत्तरादाखल आवाज वाढविल्याने संशयित रात्री बंगल्याबाहेर पडला. काही अंतर चालत जाऊन त्याने मोटारसायकलवरून धूम ठोकली.
नष्टे याचे काही मित्र बंगल्याकडे धावत आले. संशयिताने त्या सर्वांना मोबाईल खिशात ठेवण्याची सूचना केली. परत जाताना उद्या मी पुन्हा येणार आहे हे लक्षात ठेवा, असेही त्याने बजावले.
संदीप नष्टे यांनी मित्रमंडळीसह शाहूपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह गुन्हे प्रकटीकरणाचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. शहरातील प्रमुख मार्गावर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. नाकाबंदीही करण्यात आली. मात्र संशयिताचा सुगावा लागला नाही.