

कोल्हापूर : विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांना 180 रुपयांत रेल्वेने पंढरीची वारी करता येणार आहे. मध्य रेल्वेने आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोल्हापूर-कुर्डुवाडी मार्गावर विशेष रेल्वे सोडली आहे. मंगळवार, दि. 1 ते 10 जुलै या कालावधीत ही आषाढी स्पेशल धावणार आहे.
दि. 1 ते 10 जुलै या कालावधीत ही आषाढी स्पेशल कोल्हापुरातून सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुटणार आहे. दुपारी सव्वाबारा वाजता ती पंढरपूरमध्ये, तर पुढे कुर्डुवाडीत दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे. कुर्डुवाडीतून दुपारी साडेचार वाजता ही गाडी सुटेल, तर पंढरपुरातून ती सायंकाळी साडेपाच वाजता सुटणार आहे. रात्री दहा वाजता ही गाडी कोल्हापुरात पोहोचणार आहे.
ही गाडी यात्रा स्पेशल असल्याने कोल्हापूर-पंढरपूर मार्गासाठी 90 रुपये भाडे आकारले जाणार आहे. यामध्ये जाता-येता 180 रुपयांत भाविकांना पंढरीची वारी करता येणार आहे. ही गाडी दुपारी सव्वाबारा वाजता पंढरपुरात पोहोचणार असून, सायंकाळी परतीसाठी साडेपाच वाजता गाडी मिळणार आहे. यामुळे भाविकांना पाच तासांचा कालावधी मिळणार आहे. यामुळे ज्यांना एका दिवसात दर्शन घ्यायचे आहे त्यांना या गाडीने जाऊन परत येणे शक्य आहे.