

कोल्हापूर : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. अधूनमधून उघडीप देत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पावसाचा जोर वाढल्याने कमी होत चाललेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. दुपारी चारनंतर रात्री आठ वाजेपर्यंत पाणी पातळीत अर्ध्या फुटाने वाढ झाली.
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही घट होत गेली. पंचगंगेचे पाणीही पात्रात गेले आहे. आजही पावसाची उघडीपच राहील अशी शक्यता होती. मात्र, सकाळी काही काळ जोरदार पाऊस झाला. यानंतर काही काळ ऊन-पावसाचाही खेळ रंगला. त्यानंतर मात्र थांबून थांबून जोरदार पाऊस सुरू झाला.
शहर आणि परिसरासह जिल्ह्यातही पावसाचा जोर पुन्हा वाढला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू होती. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली. 35 फुटांपर्यंत गेलेली पंचगंगेची पातळी दोन दिवसांपासून झपाट्याने कमी होत सोमवारी सकाळी 8 वाजता 27.8 फुटांवर आली. यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत पातळी 27.8 फुटांवरच स्थिर राहिली. यानंतर दुपारी चारपासून पाणी पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली. रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पातळी 28.3 फुटांवर गेली. दरम्यान पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर आल्याने घाटावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता.
जिल्ह्यातील 32 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. यामुळे त्यावरून होणारी वाहतूक बंदच आहे. ती पर्यायी मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासात सरासरी 9.4 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. गगनबावड्यात सर्वाधिक 30.4 मि.मी.पाऊस झाला. शाहूवाडीत 28.4 मि.मी.पाऊस झाला. पन्हाळ्यात 17.8 मि.मी. तर आजर्यात 15.4 मि.मी. झाला. सोमवारी सकाळनंतर पावसाचा जोर वाढला. राधानगरी, पाटगाव, दूधगंगा धरण क्षेत्रात दुपारपर्यंत दमदार पाऊस झाला होता.